पान:साथ (Sath).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहता कामा नये म्हणून ?
 " ते आपलं नुसतं म्हणायचं असतं. आपण जाऊ परत नि तिथन सगळं काम बघू. तू पहिल्यांदा म्हणाली होतीस तसं इथे नुसतं एक लहानसं ऑफिस ठेवू. आठवड्यातनं एकदा येऊन गेलं तरी पुरे. बाकी सगळं तिकडे हलवू."
 " पण तू तिथे आनंदाने राहू शकशील ? केवढी धडपड केलीस, किती कष्ट केलेस इथपर्यंत येण्यासाठी."
 " एक गोष्ट तू ध्यानात घेत नाहीयेस, ज्यो. हया सगळ्याचं मला काही अप्रूप नाही. जर तू त्यात नसलीस तर त्याला काही अर्थ नाही. मान हलवू नको. मी काही अतिशयोक्ती करीत नाही. अगदी खरं तेच सांगतोय. मीसुद्धा गेले काही आठवडे खूप विचार केला. आपण धंदा वाढवीत नेला, इथे आलो ते तुला फारसं आवडलं नाही, इथलं आपलं आयुष्य तुला आवडत नाही हे सगळं मला कळत होतं. मी काही अगदीच आंधळा - बहिरा नाही. पण मला वाटलं की हळूहळू ते तुझ्या अंगवळणी पडेल, आणि तुला उमजून येईल की हया सगळ्या गोष्टी वरवरच्या आहेत, त्या आपल्याला खरा स्पर्श करू शकत नाहीत."
 " पण तरी करतातच, होय की नाही?"
 " आपण करू दिला तर करतात. पण तो वाद आता कशाला? मला फक्त एवढंच माहीत आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी माझं आयुष्य एकसुरी होतं. त्यात ज्या काही चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्यांचा सगळ्यांचा उगम तू आहेस. फक्त तू माझ्यासाठी जे केलंस त्यांच्या बदल्यात मी तुला काहीच देऊ शकलो नाही एवढंच मला वाईट वाटतं.”
 " असं म्हणू नको. असं कसं शक्य आहे ?"
 " नाहीतर मग तू मला सोडून जायच्या गोष्टी का करत्येयस ? पण तू बघशील. आता हे सगळं मी बदलून टाकीन."
 तिला काय म्हणावं ते कळेना. तिनं नुसतीच मान हलवली. आपल्याला जे हवंय त्याचा तो नेहमीच एकचित्ताने पाठपुरावा

[१२]

साथ: १७७