पान:साथ (Sath).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणशील, की आज आपल्याला कितीही किंमत असली तरी हा फ्लॅट घेणं परवडेल. ठीक आहे, परवडेल, पण तो घ्यायची गरज आहे का ? त्याच पैशाने आपण इतर काही करू शकू."
 " उदाहरणार्थ काय ? आपण मागे काही ठेवावं अशी आपल्या मुलांची तर नक्कीच अपेक्षा नाही. आधी आपला पैसा अन्यायाने मिळवलाय असं त्यांचं म्हणणं आहे, तेव्हा त्यात त्यांना वाटा नकोच असणार. मग आपण हवा तेवढा खर्च करायला काय हरकत आहे ?"
 ज्योतीची कल्पना ते एक लहानसा फ्लॅट घेऊन त्यात एका भागात ऑफिस नि एका भागात रहायची सोय करणार अशी होती. असला अलिशान दोन बेडरूमचा फ्लॅट तिच्या ध्यानी - मनीदेखील नव्हता. तोही शहराच्या श्रीमंत भागात. तिच्या आईने अर्थात वास्तुशांतीसाठी दिलेल्या पार्टीच्या वेळी हे बोलून दाखवलंच. " तू आता जरी पुण्यात असलीस तरी तुझी भेट आम्हाला दुर्मिळच. तुझ्या नव्या श्रीमंत मित्रमंडळींतून तुला आमच्यासाठी कुठला वेळ मिळणार?"
 " काहीतरीच काय बोलतेस आई ?" ज्योती जरा रागावूनच म्हणाली.
 स्मिता म्हणाली, "तुला राग का आला माहीताय ? कारण आजी म्हणाली ते खरं आहे."
 मुलीनं असलं एखादं वाक्य फेकलं की ज्योती निरुत्तर होत असे. द्यायला उत्तर नाही म्हणून नव्हे, पण अशा विधानातून तिचं आपल्याबद्दलचं मत ऐकून दरवेळी नव्याने धक्का बसायचा म्हणून. स्मितानं आपल्याविरुद्ध आजीची बाजू घ्यावी ह्याचा तिला नाही म्हटलं तरी मत्सर वाटला. मुलं पुण्यात शिक्षणासाठी राहिल्यावर त्यांनी आजीशी संबंध ठेवावा, अशी खास अपेक्षा तिनं काही व्यक्त केली नव्हती. स्मिता अधनंमधनं आजीकडे जाते, सणासुदीला तिकडे जेवते हे ऐकून प्रथम तिला बरं वाटलं होतं.
 ती म्हणाली होती, " पुण्यात तुला एक घर आहे हे बरं आहे नाही ?"

साथ: १२१