पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Y सौ. सरस्वतीदेवी राणीसाहेब हे दोघेही प्रागतिक मतांचे असल्यामुळे त्यांनी सांगलीतील अनेक सामाजिक व शिक्षणसंस्थांना मदत करुन सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले. जुन्या काळातील विठ्ठलराव जोशी, गंगुनाना कानिटकर, डॉ. व्ही. एन. देसाई, डॉ. कृ.पां. बापट, अंबूताई मेहेंदळे, तिरमारे गुरुजी, आदी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख सांगलीच्या सामाजिक परंपरेच्या संदर्भात करावाच लागेल. असे अनेक सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. विस्तारभयास्तव सर्वांचा उल्लेख करता येत नाही. कै. बाबाराव सावरकर, (स्वा. सावरकरांचे ज्येष्ठ बंधू) त्यांच्या अखेरच्या काळात सांगलीतच राहत होते. अंदमानची खडतर शिक्षा भोगून त्यांनी केलेल्या राजकीय कार्याइतकेच त्यांचे सांगलीमधील सामाजिक कार्य महत्वाचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकतें का. भा. तथा काकासाहेब लिमये हे महाराष्ट्राचे पहिले प्रांतसंघचालक होते. काकासाहेब म्हणजे सांगलीमधील एक बुलंद व्यक्तिमत्त्व होते. पहिले सरसंघचालक केशवरावजी हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांजपासून तो लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी यांजपर्यंत अनेक महनीय व्यक्ती काकासाहेबांच्या घरी येऊन गेल्या आहेत. काकासाहेब सामाजिक, राजकीय, कार्यात अग्रेसर होतेच पण त्याखेरीज त्यांनी पत्रकारिताही केली होती. 'विक्रम' नावाचे साप्ताहिक त्यांनी चालविले होते तसेच 'पौरुष' नावाचे अर्धवार्षिकही ते आयुष्याच्या अखेरच्या दिवसात चालवत होते. याच संदर्भात कै. बापूराव साठे यांचेही वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. त्यांनी गोवा मुक्ती आंदोलन, हैद्राबाद मुक्ती संग्रामात स्वतंत्र हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून काम केले होते. मिरजेतील अरब हटाओ मोहिम, शुद्धिकार्य आदी अनेक प्रकारची सामाजिक कामे त्यांनी केली व स्वा. सावरकरांना अभिप्रेत असणाऱ्या सुधारणा बहुजन समाजात पोचविण्याचा प्रयत्न केला. तसेच महत्वाचे सामाजिक काम सध्या संभाजीराव भिडे करीत आहेत. खादीची टोपी, धोतर आणि अनवाणी पायानी वावरणाऱ्या या विभुतीने हजारो लोकांपर्यंत शिवभक्ती व राष्ट्रभक्ती पोचविली आहे. त्यांच्या प्रेरणेने गडकोट मोहिम व रोज रायगडला शिववंदन अशी अभिमानास्पद कामे चालू आहेत. श्रीमती मालूताई जोशी यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. झोपडपट्टीमधील मुलांसाठी त्या अनेक उपक्रम राबवत आहेत. सांगलीची कीर्ती जशी कर्तृत्ववान व्यक्तिंमुळे पसरली तशीच ती मळीकाठची वांगी, भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसं, असाचा रस, फिके पेढे यामुळेहि पसरली. मुंबईचा पाहुणा परतताना आवर्जून कृष्णाकाठची वांगी, लुसलुशीत कोवळ्या काकड्या घेऊन जात असे. पण सांगलीचं नाव सर्वतोमुखी झालं ते मात्र कुरकुरीत, चटकदार भडंगामुळे. सांगलीचे भडंग सर्वत्र प्रसिद्ध आहेत. आणि त्याचं श्रेय गोरे बंधुंकडे जातं ! सांगली आणि सांगलीकर.. . २३५