मागवत, स्वतः त्याचा विचार करून समतोल निर्णय घेत. तरीसुद्धा विद्या प्रसारक चळवळीचे सयाजीराव पहिले आश्रयदाते (Patron) झाले. पुढे सयाजीरावांच्या कार्यात शाहू महाराजांनी भर घातली. (चव्हाण, २००७, ५१६)
सयाजीरावांचे धोरण सामिलकीचे असल्याने कट्टर हिंदुत्ववादी, सावरकरवादी, फुल्यांचे सत्यशोधक, आर्यसमाजाचे, बुद्धिस्ट आणि पुरोगामी विचारांची माणसे त्यांच्याकडे नोकरीला होती. या सर्वांना बरोबर घेऊन सयाजीराव महाराजांनी सामिलकीच्या धोरणाचा पुरस्कार केला. महाराष्ट्रालाच नव्हे तर सर्व हिंदुस्थानाला गौरव आणि अभिमान वाटावा असे या दोघांचे कार्य आहे. लॉर्ड कर्झन आणि महाराजा सयाजीरावांचा संघर्ष हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आपापल्या क्षेत्रात ठाम असलेल्या या दोन व्यक्तींची स्वाभिमान अधिकारासाठीची ही जणू लढाई होती. लॉर्ड कर्झनचा कार्यकाल संपला आणि ते विलायतेला परत जायला निघाले त्यावेळी निरोप समारंभात शाहू छत्रपती आणि कर्झन यांचे बोलणे झाले. कर्झन यांनी शाहूजवळ महाराजा सयाजीरावांची मोकळ्या मनाने स्तुती करताना म्हटले, “सयाजीरावांची तुलना एखाद्या शक्तिशाली वाफेच्या इंजिनाशी करता येईल. आणि मी जे सांगतोय ते सत्यच आहे. मी आशा करतो की हिंदुस्थानातील आणखी राजांनी सयाजीरावांच्या चांगल्या कामांचे अनुकरण करावे.” (शाहू पेपर्स खंड-४, २४२) कर्झनने आपल्या कालखंडात हिंदुस्थानातील राजांवर बंधने