Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३ : स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग

३ : १ ब्रिटिश सत्तेशी सयाजीरावांचा संघर्ष :
 सयाजीराव महाराज जेव्हा राज्यकारभार पाहू लागले तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आणि बडोद्यामधील मैत्रीचा करार त्यांच्या पाहण्यात आला. आपण ब्रिटिश सरकारचे मांडलिक नसून मित्र आहोत, ही सार्वभौमत्वाची भावना त्यांच्या मनात पक्की रुजली. प्रत्यक्षात ब्रिटिश सरकारचे बडोद्याचे प्रतिनिधी-रेसिडेंट हे संस्थानाकडे एक मांडलिक म्हणूनच बघत. सयाजीरावांनी पहिल्या दहा वर्षांत बडोद्यात शिक्षण, ग्रामपंचायती, ग्रंथालये, सामाजिक सुधारणा, शेती-उद्योग आणि प्रशासनात ज्या लक्षणीय सुधारणा केल्या त्याची चर्चा ब्रिटिश मुलखातही सुरू झाली. दादाभाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक, नामदार गोखले, न्या. रानडे, रामकृष्ण भांडारकर ह्या मंडळींचा संबंध बडोद्यात वाढू लागला. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनातही सयाजीरावांची मदत आणि उपस्थिती ब्रिटिश सत्तेला आवडत नव्हती. यातून रेसिडेंट आणि सयाजीरावांतील ताणतणाव वाढत गेले. रेसिडेंट बंध घालू लागले.

 विवाहानंतर महाराणी चिमणाबाईंचे चारेक वर्षांत निधन झाले. ह्या दु:खद धक्क्याने सयाजीरावांना निद्रानाशाचा विकार बळावला. दुसऱ्या महाराणीशी विवाह झाला; पण विकार कमी होईना. डॉक्टरांच्या सल्ल्याने थंड हवेच्या ठिकाणी हवापालटसाठी विलायतेत जाऊन आले. हा प्रवास मानवल्याने

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / ३४