पान:सफर मंगळावरची.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अन्न हे परब्रम्ह


 "आई, पावभाजी मस्तच झालीय हं."
 मिलींद पावभाजीवर ताव मारताना म्हणत होता. त्याची आई मग खूश होऊन जाई.
 "घे, ना. "म्हणून त्याला आग्रह करीत होती. मिलींदने पोटाला तडस लागेपर्यंत पावभाजी खाल्ली. आता दूध, फळे काही नको.
 मिलींदची आई शिक्षिका आहे. त्याच्या बाबांची नोकरी फिरतीची. आज ह्या गावाला उद्या त्या गावाला. घरात हे मायलेक दोघंच. आई मग रोजच्या रोज पोळी, भाजी, भात, आमटी असा सगळा स्वयंपाक करायची नाही. सुट्टीदिवशी मात्र खास बेत असायचा. पावभाजीच्या भाजीत जास्त भाज्या असतात. शिवाय घरात केल्यामुळे तेल, मसाले कमीत कमी वापरता येतात. पण त्या दिवशी मिलींद दूध, फळ न खाता फक्त असा पदार्थच भरपूर खायचा. दुपारी तेच खाल्लं, अन् मस्तपैकी ताणून दिली.
 "टिंग S टाँग SS"
 दारावरच्या घंटीच्या आवाजाने मिलींद उठला. अनिल आला होता.
"मिलींद, आज माझ्या वाढदिवसाची पार्टी आहे. सात वाजता ये."
 "हॅपी बर्थ डे टू यू. तुला गिफ्ट काय आणू रे?" अनिलचा हात हातात घेत मिलींद म्हणाला.
 "काहीही ! मोकळा आलास तरी चालेल."
 "मोकळ्या हाताने आई येऊ देणार नाही, पण मोकळ्या पोटाने मात्र नक्कीच येणार आणि भरपूर खाणार."
 “खा की मग, आई मिसळ करणारेय. ये रे. जातो मी. बाय. "
 असं म्हणून अनिल गेला. मिसळ म्हटलं की मिलींदच्या तोंडाला पाणी सुटलंच. अनिलला पेन आणायचा म्हणून त्याने आईकडून पैसे घेऊन निघाला. आई म्हणाली,

 "एवढं दूध पिऊन जा."

64 / सफर मंगळावरची