पान:सफर मंगळावरची.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आज काय झालंय राजूला. स्वतः बॅटिंग न करता एक्स्ट्रा कव्हरकडे जातोय अन् सगळ्यांना बॅटिंगचा चान्स देतोय. शेवटी राजूचा नंबर आला. खरं तर खूप अंधारून आलेलं. पण राजूची बॅटिंग म्हटल्यावर मुलं गपचीप मैदानावर आपापल्या जागी उभी राहिली. तर राजूच म्हणाला, "आता अंधार पडलाय, आता राहू द्या. उद्या खेळू. चला घरी.”
 पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का. राजूने स्टंप उपसून घेतल्या. प्रत्येकाने काही ना काही घेतले. बगळ्याला बॅट किंवा स्टंपा खांद्यावर टाकून ऐटीत चालायची भारी हौस पण राजू त्याला बॅटला हात लावून द्यायचा नाही. त्याच्याकडे स्टंपा आणि बॅट देत राजू म्हणाला,
 "घे, घरात ठेव जा."
 मग काय बगळ्या पळतच गेला. स्टंपा आणि बॅट ठेवायला.
 घराजवळच्या कठड्यावर कुलदीप, राजू गप्पा मारत बसले. ते दोघे एकाच वर्गात होते. कुलदीप खूप हुशार होता. वर्गात पहिला नंबर असायचा नेहमी. राजूला गृहपाठाच्या वेळी बरीच मदत करायचा. त्यामुळे राजू त्याच्याशी तेवढी दादागिरी करीत नसे. दोघांचं जमायचं छान. कुलदीपला त्याच्यात असा अचानक झालेला बदल जाणवला. त्याला विचारल्याशिवाय राहवेना.
म्हणून तो म्हणाला,
 " काय रे राजू, आज काय झालंय तुला, वेगळाच वागतोयस?"
 "काही नाही, असच रे."
 " तरी पण सांग ना विशेष कायेय ?"
 "अरे, काल मी अन् सतीशदादा बाजारात गेलो होतो. तर एक लंबा-चवडा माणूस आमच्यासमोर आला. सतीशदादाला पण लवकर ओळखायलाच आला नाही. त्याने एकदम सतीशदादाची कॉलरच पकडली. अन् म्हणाला, काय सत्या कसं चाललंय ? तुझी तर रयाच गेली की रे! लहानपणी आम्हाला केवढा सतवायचास."

 सतीशदादा कसला घाबरला. म्हणतोय कसा, अरे, तेव्हाची गोष्ट वेगळी. आता काय तू मोठा झालायंस सगळ्याच बाबतीत ! विसरून जा. असा गयावया करीत होता. मग तोच माणूस म्हणाला, जातो विसरून पण इथून पुढे ह्या लहानग्यांना सतवायचं नाही. अन् माझ्याकडे बघून म्हणाला. ह्याने तुम्हाला त्रास दिला तर मला सांगा. मी बघून घेईन. मला तर हसूच आलं. मग त्याने

६२ । सफर मंगळावरची