पान:सफर मंगळावरची.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रंग चांगला दिसत नाही ते? माणसांना तर काळा रंग फार आवडतो. म्हणून तर तू माणसांच्या लहान मुलांचा आवडता आहेस. तुझ्यावर कितीतरी गाणी आहेत. घरावर कावळा ओरडला तर सासुरवाशिणीला वाटतं तिच्या माहेरचं कोणीतरी नक्की येणार. म्हणून ती तुझ्यावर केवढी खूश असते. तुला माहितेय का ? आता तर माणूस केस पांढरे व्हायला लागले की काळे करतो.” बगळा म्हणाला.
 "पण माणसाला कातडीचा रंग मात्र गोरा किंवा पांढराच हवा असतो. काळ्या पोरींची लग्नेही लवकर ठरत नाहीत. " कावळा म्हणाला.
 "अरे पण असाच तू छान दिसतोस. घाण लागली तरी लक्षात येत नाही. हा फायदा नाही का ?" बगळा.
 "अरे मी शिवलेला चालत नाही माणसाला. विटाळ होतो. काळा आहे म्हणूनच ना?"
 " अरे आपल्यात तरी कुठे चालते, माणसाने शिवलेले ?" "ते काय न्हाय मी बघ उद्या माणसाचा साबण आणून लावतोच अंगाला. साबणाने अंग धुतो म्हणजे बघ, गोरा होतो की न्हाय." असं म्हणत काव, काव करत कावळा उडून गेला. त्याने माणसाच्या वस्तीत गेल्यावर, एका मोरीतला साबणाचा तुकडा चोचीत पकडून आणला. नदीत अंग भिजवून बगळ्याला सांगितले.
 "आता लाव पंखांना भरपूर साबण."
 बगळ्याने त्याला साबण लावल्यावर खूप फेस झाला. दोघांना फार मजा वाटली. आता काळेपणा नक्की जाईल असं वाटलं. पण कशाचं काय, अंग धुतल्यावर बघितलं तर, कावळ्याच्या पंखांचा काळेपणा आणखीनच चमकायला लागला. कावळा हिरमुसला.
 "अरे, खरंच तू खूप चांगला दिसतोयस. तुला सांगू, निसर्गाकडून मिळालेले रंगरूप परिस्थितीतला अनुरूप असते. उगाच बदल करून त्यात ढवळाढवळ करू नये, माणसासारखी. त्यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो.” बगळा म्हणाला. "माणूस किती का घाण करेना. ते चालतं सगळ्यांना. मी फक्त गोरा व्हावं म्हणतोय, तर लगेच उपदेशाचे औषध पाज. तुला एवढी बुद्धी आहे तर काहीतरी उपाय शोधून काढ ना. मला जबरदस्त इच्छा आहे गोरं होण्याची. ही इच्छा अपुरी राहिली ना तर माझ्या पिंडाला माणूस शिवणार नाही. "

 "तुझा अजून असल्या गोष्टीवर विश्वास आहे?"

२२