पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. चमत्कारांच्या या सर्व गोष्टी आहेत. शिवाजी व रामदास यांच्या संबंधाच्या आणखी दोन तीन दंतकथा येथे देणें आवश्यक आहे. रामदासाकडे चाफळास दूर जाण्याचा वारंवार त्रास होऊं नये ह्मणून शिवाजीनें सन १६५० मध्ये रामदासांस परळीच्या किल्ल्यावर राहण्यास येण्यास विनंति केली व तदनुरूप अका, वेणू, व आणखी एक दोघे शिष्य यांसह रामदास परळीच्या किल्ल्यावर राहण्यास आले; बाकीचे शिष्य चाफळास राहिले; याचवेळी शिवाजीनें चाफळाच्या मठास व परळीच्या मठास कित्येक गावें इनाम करून दिली. शिवाजी प्रत्येक वेळी रामदासांस भेटण्यास गेला म्हणजे स्वामींची सेवा कोणत्या तऱ्हेने करूं असें विचारीत असे. एका वेळी शिवाजीचें राज्य जिकडे नाहीं तिकडील गांवांची नावें घेऊन सनद करून द्यावी म्हणून रामदासानी आज्ञा केली. तेव्हां शिवाजीनें विनंति केली कीं महाराज, तिकडे राज्य आपलें नाहीं; सबब तिकडील सनदा पत्रे कशी करून देऊं.' तेव्हां समर्थ बोलले की तुला या विचाराचें कारण काय. आह्मी सांगितल्याप्रमाणें सनदा पत्रे करून देणें. असें म्हटल्यावरून शिवाजीनें सनदा पत्र लिहून ठेवलीं. तीं पत्रें समर्थानीं घेऊन शिष्यांचे स्वाधीन करून त्या त्या गांवांस जावें, म्हणून आज्ञा केली, त्याप्रमाणें तेथें तेथे जाऊन शिष्य राहिले. ज्या ज्या गांवीं शिष्य जाऊन राहिले, त्या त्या गांवांपर्यंत शिवाजीमहाराजांचें राज्य होऊन त्यानें त्या त्या संस्थानाचा बंदोबस्त करून दिला. या गोष्टीचा मतलब इतकाच कीं रामदास अवतारी पुरुष. त्यांच्या इच्छेप्रमाणें आपोआप गोष्टी घडून येत असत. पण हें जर खरें तर सर्वच राज्य शिवाजीला रामदासांनीं एकदमच कां दिलें नाहीं. शिवाजीला खट- पट करण्याचा त्रास कशास ठेवला. एका प्रसंगी शिवाजी रामदासांस भेटण्यास आला असतां रामदासांनी म्हटले, 'इल्लीं यवनी राज्य नसतां जोहार ह्मणण्याचा पाठ आहे. हा ठीक नाहीं, तर इतःपर सर्वत्रांनीं एक- मेकांस रामराम ह्मणत जावें.' तेव्हांपासून शिवाजीनें आपल्या सर्व राज्यांत ही रामरामाची पद्धति सुरू केली.