पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

.  हे पुस्तक लिहिण्याचा योगायोग विलक्षण तऱ्हेने जमून आलेला आहे.. रामदासाचा प्रसिद्ध ग्रंथ दासबोध याचा काळजीपूर्वक अभ्यास कर- ण्याची माझी मनीषा फार दिवसांपासून होती. पण इतर व्यवसायांमुळे ती अलीकडे तडीस गेली नव्हती. माझ्या पायगाडीच्या प्रवासप्रियतेमुळें परळीस पायगाडीनें जाण्याचा योग आला. त्या निमित्तानें मी दासबोधाचा अभ्यास सुरू केला होता. त्या वेळीं मुंबईच्या हेमंत व्याख्यानमालेच्या चिटणीसाचें व्याख्यानासंबंधीं विनंतिपत्र आलें. तेव्हां 'रामदासांची शिक- वर्ण' याच विषयावर मी व्याख्यान देण्याचा बेत केला. यामुळे दासबो घाचा अभ्यास जलदीने करावा लागला. याच सुमारास उद्यानकर्ते रा. कुळकर्णी यांनी आपल्या मासिकाच्या संक्रांतीच्या अंकाकरितां एक प्रवास- वृत्तपर लेख मागितला. म्हणून मी माझ्या परळीच्या प्रवासाचे वृत्त त्या अंकाकरितां लिहिलें. पुढें दासबोधाच्या अभ्यासानें रामदासांच्या शिक- वणीबद्दल आपलीं बनलेलीं मतें प्रसिद्ध करण्याच्या बुद्धीनें 'रामदासांच्या दासबोधांतील उपदेशा' संबंधानें एक लेखमाला मी उद्यानांत सुरू केली व त्यांत कांहीं लेख लिहिले.
 रामदासांच्या शिकवणीबद्दल महाराष्ट्रांत बराच मतभेद आहे. तेव्हां स्वतंत्रपणें व कोणताही पूर्वग्रह मनांत न धरतां झालेलीं माझीं मतें मासि- काच्या रकान्यांत न राहू देतां त्यांना पुस्तकरूपाचें जास्त कायमचें स्वरूप द्यावें अशी माझ्या कांहीं मित्रांनी प्रेमळपणे केलेली सूचना मला पसंत पडली व पुढले लेख मासिकांत न लिहितां सर्व विचार एका लहानचा पुस्तकाच्या रूपानें प्र करण्याचा निश्चय केला. याप्रमाणें या पुस्तक प्रकाशनाचा योगायोग आलेला आहे.
 या पुस्तकांतील कांहीं भाग फार वादग्रस्त आहे तरी पण पुढें आलेल्या पुराव्यावरून जीं प्रामाणिकपणें माझीं मतें बनलीं तीं मीं या पुस्तकांत दिली आहेत. तीं पक्षाभिमानानें किंवा वर्णाभिमानानें प्रेरित झालेलीं नाहींत इतकें सांगून ही अल्प प्रस्तावना संपवितों.
पुणें.

ता. २५/७/१८.

लेखक.