पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६-

सज्जनगड व समर्थ रामदास.

रामदासाचा दासबोध हा बराच मोठा ग्रंथ आहे. ..त्याचे वीस दशक (प) असून प्रत्येक दशकांत दहा समास (अध्याय) आहेत व प्रत्येक अध्यायांत सरासरी- नें चाळीस ओव्या आहेत म्हणजे एकंदर ग्रंथांत सुमारें आठ हजार ओव्या आहेत. हा ग्रंथ गुरुशिष्यसंवादात्मक आहे. मात्र इंग्रजी जाणणान्यास ठाऊक असलेल्या प्रसिद्ध ग्रीकतत्त्ववेत्या प्लेटोच्या सं- वादात्मक ग्रंथाप्रमाणें तो नाहीं. प्लेटोचे संवाद म्हणजे भूमितीच्या विचार- पद्धतीनें साधक बाधक प्रमाणांचा खल करून दोनतीन माणसांच्या प्रश्नोत्तररूपी संभाषणांतून काढलेल्या सिद्धांताप्रमाणें आहेत. त्यांत विचार- सरणींतील युक्तिवाद व सिद्धांत बनविण्याची पद्धति यांकडे विशेष लक्ष दिलेलें आहे. प्रत्यक्ष सिद्धांत सांगण्यांत फार भर नाहीं व म्हणून प्लेटोचे ग्रंथ म्हणजे मनांतील विचाराच्या व विचारपद्धतीच्या पृथक्करणाचे उत्तम मासले आहेत असें समजलें जातें. ज्याप्रमाणें एखादा प्राणिशास्त्रज्ञ निर- निराळ्या प्राण्यांच्या शरीरांचे छेदन करून त्यांचे निरनिराळे भाग व अव- यव स्पष्टपणे दृग्गोचर होतील अशा तऱ्हेनें तीं शरीरें प्रयोगशाळेत जतन करून ठेवतो, त्याचप्रमाणें प्लेटोचे ग्रंथ म्हणजे मानवी मनाच्या व्यापाराचे पृथक्कृत मासले आहेत. रामदासाचा संवादात्मक ग्रंथ अशा तऱ्हेचा नाहीं. तेथे प्रथमारंभीं शिष्याने एकाददुसरा प्रश्न विचारलेला असावयाचा व त्याचें सिद्धांतात्मक उत्तर गुरून द्यावयाचें अशा तऱ्हेची पद्धति या ग्रंथांत आहे. या ग्रंथांतली पद्धति गीतेंतील पद्धतीप्रमाणें आहे असें म्हटलें तरी चालेल.
 आठ हजार ओव्यांचा ग्रंथ एकदम किंवा एका सपाट्यासरसा लिहिला असेल असें संभवत नाहीं. तो हळू हळू व सावकाशपणे लिहिला गेला असला पाहिजे हें उघड आहे. तरी पण दासबोधाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास त्याचे दोन भाग पडतात असें वाटल्यावांचून रहात