पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.

२५


उत्पन्न करणारा कर्ता पुरुष होता व म्हणून सर्व संतामध्यें व कवींमध्यें अन्वर्थक रीतीनें 'समर्थ' या पदवीस योग्य होता. त्यानेंच शिवाजीस राजकारण शिकावलें; त्यानें शिवाजीमध्यें राजकीय स्फूर्ति उत्पन्न केली, तोच प्रथमपासून शिवाजीचा मसलतगार होता, त्याच्याच प्रयत्नानें आणि शिकवणीनें शिवाजीस इतके मदतगार मिळाले. सारांश मराठ्यांच्या उद- याचें श्रेय कै. रानडे म्हणतात त्याप्रमाणें संतकविमंडळास नाहीं; किंवा डफ एल्फिन्स्टन म्हणतात त्याप्रमाणे शिवाजीस नाहीं तर तें श्रेय राम- दासास आहे; व ह्या म्हणण्याचें प्रत्यंतर म्हणजे रामदास शिवाजीचा राजगुरु होता; तो साताऱ्याजवळ परळीस रहात असे, शिवाजीनें आपलें सर्व राज्य रामदासास समर्पण केलें व त्याची खूण म्हणून मराठ्यांनी भगवा- झेंडा हें आप राष्ट्रीय निशाण बनविलें व रामदासाच्या नमस्काराची पद्धति स्वीकारली या गोष्टी होत.
 महाराष्ट्रांतील संतकविमंडळ व रामदास यांच्या कामगिरीबद्दल अशा प्रकारचा मतभेद महाराष्ट्रांत प्रचलित होता व आहे. तेव्हां रामदासाचा प्रसिद्ध व प्रचंड ग्रंथ दासबोध हा काळजीपूर्वक वाचून या मतांमध्यें खरें. कोणचें हें आपण पहावें अशी माझी पुष्कळ दिवस इच्छा होती व त्या करितां मी दासबोध आणूनहि ठेवला होता; पण इतर कामांमुळें तो बेत मनांतल्या मनांत राहिला होता. पण पायगाडीने सातारा व रामदासाची परळी पहाण्याची जेव्हां मला संधि आली त्या वेळेपासून मी दासबोधाच ! अभ्यास करूं लागलों. या लेखांतील मतें दासबोध प्रत्यक्षपणें व काळजी- पूर्वक व पूर्वग्रहरहित मनानें वाचून झालेली आहेत; रामदासाच्या महत्वा- बद्दल अमूक मत चूक किंवा अमूक मत बरोबर असें आधीं ठरवून हीं मतें बनविलेलीं नाहींत इतकें सांगून आतां मी दासबोधाकडे वळतो.