पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सज्जनगड व समर्थ रामदास.

मी बेत केला होता. माझ्या पायगाडीच्या प्रवासाचा एकाएकीं बेत झाल्यामुळें त्या गृहस्थांना आर्धी पत्र पाठविणें शक्य नव्हतें. पुण्याहून निघतांना तार करावी असें एकदां मनांत आलें होतें, पण त्या ठिकाणास तार असेल किंवा नाहीं या शंकेनें व इतकें करण्यास स्वस्थपणाही नसल्या- मुळें तें तसेंच राहून गेलें होतें. अर्थात् त्या गृहस्थाकडे अनपेक्षितपणानें जाणें आह्मांस भाग होतें. शिरवळ गांवाच्या जवळ आल्यावर आम्हीं रावबहादूरांच्या बंगल्याची चौकशी करूं लागलों, तों त्यांचा बंगला शिरव- ळाच्या पलीकडे आहे असें कळलें. अशा वेळीं अशी बातमी म्हणजे दुष्काळांत तेराव्या महिन्याप्रमाणें वाटते. कारण, आतां आमचीं घोडीं थकत आलीं होतीं. रात्रीमुळे फार वेगानेही जातां येईना. विचारपूस करीत करीत आह्नीं शिरवळ गांवाला फुटणाऱ्या रस्त्याशीं आलों. तेथें समजलें कीं, देशपांड्यांचा बंगला पुणे-साता-याच्या रस्त्यावरच आणखी दोन मैलांवर डाव्या बाजूसच आहे. माझी कल्पना बंगला गांवाच्या आस- पास असेल, अशी होती. पण तो दोन मैलांच्या लांबीवर आहे असें ऐकून आमच्या थकलेल्या जीवाचें धावें दणाणलें, व शिवाय त्या गृह- स्थांच्या घरीं जाण्यास अवेळ होणार असें वाटूं लागून त्यांना उगाच आपल्याकरितां त्रास पडणार अशी भीति वाटूं लागली. आतांची वेळ रात्रीची; रस्ताही चढावाचा लागूं लागला; समोर काळा काभिन्न डोंगर दिसूं लागला व सभोवार भयाण ओसाड माळचमाळ लागूं लागले. जवळ-- पास कोठे झोपडीची किंवा वस्तीची खूण दिसेना. यामुळे आपण वाट तर चुकलों नाहीं किंवा त्यांच्या बंगल्याच्या पुढें तर आलों नाहीं अशी शंका येऊ लागली. इतक्यांत उजव्या हाताला एक जुनें देऊळ दृष्टीस पडलें. आतां बंगला सांपडला नाहीं तर या पडक्या जुन्या देवळांत रात्र काढण्याचा आह्मीं बेत केला व तसेच हळुहळू पुढे चाललों, तों डाव्या बाजूस बंगल्यासारखें कांहींतरी दिसूं लागलें, व आमच्या जीवांत जीव आला. थोड्याच अवकाशाने उजव्या बाजूस सडक फुटलेली दिसली. हीच रावबहादूरांच्या बंगल्याची सडक असली पाहिजे, असा आह्मीं तर्क केला. इतक्यांत बंगलाच स्पष्टपणें दिसला व चक्षुर्वै सत्यं या म्हणीचा