पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निमित्तानं त्याच्या दबलेल्या रागाचा व संतापाचा उद्रेक होतो. मग हिंसा, महिलांवरील अत्याचार, दहशतवाद हे एकरूप या उद्रेकाचं दिसतं तर दुसरं ताणतणावाचं. सत्तर-ऐंशी टक्के तरुण जर असे अस्वस्थ व आशेचा दीप मालवून बसलेले असतील तर देश कसा समर्थ होणार? त्यामुळे आजचा तरुण जातीय अस्मिता, इतिहासकालीन प्रेरणा आणि भ्रामक धार्मिक परंपरेत अडकला जात आहे. पुन्हा निवडणुकीच्या राजकारणामुळे तो धर्म-जात-समूहाची आधुनिक काळाला विसंगत असणारी अस्मिता जखमांप्रमाणे कुरवाळीत बसत आहे. तो ‘व्हिक्टिमहुड सिंड्रोम'चा शिकार झाला आहे. हे सारे आम्ही लेखकांनी लिहायचे नाही, तर कुणी लिहायचे ? ते लिहिताना सरकार, राजकीय पक्ष आणि भ्रष्ट बेलगाम झालेल्या शासन व्यवस्थेवर आसूड ओढायचे नाहीत का?, भाष्य करायचं नाही का?, आवाज उठवायचा नाही का? तो निर्भीडपणे उठवलाच पाहिजे. धोरणकर्त्या सरकारला आणि अंमलबजावणी करणा-या नोकरशाहीला जाब विचारला पाहिजे! माझी लाईफ' ‘टाइम'चा ‘फॉर्म्युन या कथेत भ्रष्ट व्यवस्थेचे बळी ठरलेले तीन तरुण तीन भिन्न दिशेने कसे जातात हे दाखवले आहे. एक टोकाची भूमिका घेत नक्षलवादी होईन म्हणतो, दुसरा परिस्थितीशी जमवून घेत भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होतो, तर तिसरी तरुणी याविरुद्ध लढण्याचं ठरवते. ही आजच्या तरुणाची प्रातिनिधीक स्वरूपाची कहाणी आहे. ती व्यापक अर्थात राजकीय कथा आहे.

 मी आता 'इंडियन एक्स्प्रेस' मधली एक बातमी सांगणार आहे. तिचं शीर्षक आहे, 'No country for women, children and Dalit' नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो डाटा २०१६ च्या अहवालाच्या आधारे या बातमीत हा तुमचा-माझा देश स्त्री. मुले व दलितांसाठी त्यांच्यावरील वाढत्या गुन्हे व अत्याचारामुळे कसा व किती असुरक्षित झाला आहे, यावर भेदक प्रकाश टाकला आहे. अल्पवयीन मुलेखास करून मुलीवरील बलात्कार आणि ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स' (पोंकसो) या कायद्याखाली नोंदलेल्या गुन्ह्यात ८२% वाढ एका वर्षात झाली आहे. गरिबी, कंटाळवाणी शाळा आणि शिकून उद्या काय नोकरी मिळणार आहे? तर मग आजच कामास लागून पैसा कमवावा म्हणून लाखो बालकाचं बालपण हिरावून घेतलं जातंय. बालमजुरी हा देशावरचा सर्वांत मोठा कलंक आहे. लहान वयात मुलांना उबदार घर व सुरक्षित बालपण -शिक्षण व मनोरंजन, क्रीडा सोडून दहा-बारा तास उरस्फोडी काम करावं लागणं किती भयानक आहे? त्यामागे भ्रष्ट राजकारणी व नोकरशाहांची नफेखोर मालकांशी झालेली युती आहे. हे मी माझा 'हरवलेले बालपण' कादंबरीत दाखवले आहे. ज्या देशाचं बालपण असुरक्षित आहे, तो देश कसा सुरक्षित राहील? यावर अभ्यासकासोबत कलावंतांनी पण आवाज उठवला पाहिजे. बालमजुरी बंद झाली पाहिजे. बालकांवर अत्याचार होणार

२० / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन