पान:संतवचनामृत.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना होईल" असा त्यास दृष्टांत झाल्याने ते आळंदीस आले. या प्रसंगाची हकीकत च्यांनी स्वतःच पुढील अभंगांत दिली आहे: श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥ . दिव्य तेजःपुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥ . अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आळंदी काढ वेगी। ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापुरी । तंव नदीमाझारी देखिले द्वार ॥ एकाजनार्दनीं पूर्वपुण्य फळलें। श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥ ५ ॥ या अभंगावरून त्यावेळी ज्ञानदेवाच्या समाधीचे द्वार नदीमध्ये होते असे दिसते. हल्ली जेथें सिद्धेश्वरापुढील नंदी दाखविला जातो तेथे त्यावेळी नदीचे पात्र असावें असे दिसते. असो. एकनाथ त्यामार्गाने जाऊन त्यांनी अजानवृक्षाची मुळी सोडविली असावी असे दिसते. ही गोष्ट शके १५०६ मध्ये घडली. याच साली एकनाथांनी भाद्रपद मासी कपिलाषष्ठीस ज्ञानेश्वरीचें संशोधन करून आधुनिक ज्ञानेश्वरी जगास दिली. काही जुन्या रूपांबद्दल नवी रूपे घालणे वगैरे किरकोळ सुधारणांखेरीज त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये फारशा सुधारणा केल्या असे त्यांच्या शब्दांवरून दिसत नाही. ज्ञानेश्वरीच्या पाठांत ओंवी घुसडून देणारा अमृताच्या ताटांत नरोटी ठेविणान्याप्रमाणेच हास्यास्पद होईल, असे त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या संशोधनपत्रिकेत म्हटले आहे. एकनाथ कीर्तन करितां करितांच पैठण येथे शके १५२१ मध्ये समाधिस्थ झाले. त्यांची भागवत एकादशस्कंधावरील टीका, भावार्थ रामायण (rr अध्याय), रुक्मिणीस्वयंवर, स्वात्मसुख, चत:लोकी भागवतावरील टीका, अभंग, वगरे पुष्कळ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या पुस्तकांत एकनाथांच्या अभंगांखेरीज दुसरीकडुन उतारे घेण्याची सवड नव्हती. शिवाय अभंगांतूनच उतारे घेण्याचे हेही एक कारण आहे की, अभंगांत एकनाथांचे अंतःकरण जितकें उघड रीतीने दृग्गोचर होते, तितके ते त्यांच्या इतर ग्रंथांत होत नाही. एकनाथांचे इतर ग्रंथ बुद्धिवादाचे आहेत, पण अभंग अनुभवप्रधान आहेत. एकंदरीत ज्ञानेश्वरांप्रमाणे बुद्धीस थरारून सोडणारी अशी ग्रंथरचना जरी एकनाथांनी केली नाहीं; तुकारामांसारखे अत्यंत हृदयस्पर्शी व कोमल असे अभंग जरी त्यांनी लिहिले नाहीत; रामदासांप्रमाणे कर्मयोगित्वाचा बाणाही त्यांनी जरी 'पत्करला नाही; तथापि प्रपंच व परमार्थ यांची विलक्षण सांगड घालून संसारांमध्ये