पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोन्याची कुऱ्हाड

५१

गुलाबी असा असून आकाराने प्रत्येक अंडाशय सुमारें दीड इंच लांब, पाऊण इंच रुंद, एकतृतीयांश इंच जाड असतो, व वजनांत तो फार तर पाव औंस भरतो.
 हें अंडाशयांच्या रचनेविषयीं झालें. त्यांचें विशिष्ट कार्य म्हटले तर तें दुहेरी आहे. कारण दोन भिन्न भिन्न पदार्थांची उत्पत्ति त्यांच्या- पासून होत असते. वर सांगितलेच आहे, कीं स्त्रीच्या सूक्ष्मांडांची उत्पत्ति करणें हें अंडाशयांचे पहिले कार्य. या त्यांच्या कार्यास आपण उत्पादक कार्य असें नांव वाटल्यास देऊं. पण याखेरीज एक प्रकारचा अंतर्गत स्राव उत्पन्न करण्याचेही कार्य अंडाशयांच करावें लागतें. हा अंतर्गत स्राव स्त्रीच्या रक्ताशी समरस होऊन जातो, आणि स्त्रीच्या देहसंवर्धनाच्या व तत्संबंधींच्या सर्व घडामोडींत या स्रावाचें महत्त्व फार आहे. सूक्ष्मांडांची गोष्ट अशी आहे, कीं स्त्री वयांत येऊन ऋतुमती झाली म्हणजे त्यांची उत्पत्ति सुरू होते, आणि स्त्रीचा ऋतुक्षमतेचा कालावधि संपून तिचा विटाळ गेला म्हणजे त्यांची उत्पत्ति बंद होते. पण या अंतर्गत स्रावाचें असें नाहीं. स्त्रीच्या सबंद आयुष्यभर त्याची उत्पत्ति चालूच असते. या अंतर्गत स्त्रावामुळे स्त्रीच्या अंगोपांगांस एक प्रकारचा गोलपणा प्राप्त होतो, तिचा केशकलाप लांबसडक असा वाढतो, तिच्या ठिकाणीं योग्य वयांत कुचोद्गम होतो, तिच्या कटीखालचा प्रदेश विस्तार पावतो आणि तिच्या आवाजांत पुरुषाहून निराळीच अशी मधुरता येते. या अंतर्गत स्त्रावाच्या अभावी ही लक्षणें स्त्रीच्या ठिकाणीं दिसणार नाहींत व एकंदरींत ती दिसावयास मर्दानी दिसेल. अंडा- शयाखेरीज बाकीच्या जननेंद्रियाची वाढही या अंतर्गत स्त्रावावर अवलंबून असते, आणि हा अंतर्गत स्राव चालू असतो म्हणूनच स्त्रीला कामवासना होते व ती पूर्ण झाली असतां तिला सुख वाटतें. यासाठींच या स्रावाचें महत्त्व फार आहे असें आम्हीं वर म्हटलें.