पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनाचें अगत्य

२१

फारसे मनावर घेत नाहीं, आणि मोठ्या पिंग्या उंदरांचा मात्र आपण विध्वंस करूं पहातों. लहान जातीच्या उंदरांची गोष्ट अशी आहे कीं, ते येवढेसे असल्या कारणानें कुठेही शिरकाव करूं शकतात, आपल्या डोळ्यावर फारसे येत नाहींत, आणि अन्नाच्या लहानसहान तुकड्यांवरही त्यांची उपजीविका होऊं शकते. मोठ्या पिंगट उंदराला यांपैकी कोणतीही सवलत मिळत नाहीं. याचा परिणाम असा होतो, की या उंदरांची जात जरी शरीरानें, सामर्थ्यानें आणि धूर्ततेनें सुद्धां लहान उंदरांपेक्षां मोठी आहे तरी तिचा उत्पादन वेग त्यांच्या वेगापेक्षा कमी असून चालत नाहीं. '
 आणखी उदाहरणे देत बसण्याचें कारण नाहीं. येवढ्या विवे- चनानें वाचकांची खात्री पटलीच असेल, कीं (१) एक तर मनुष्य हा सर्व प्राण्यांहून श्रेष्ठ प्रतीचा असल्यामुळे, त्याची आयुर्मर्यादा सर्वोहून अधिक असल्यामुळे, आणि बुद्धि व स्वसंरक्षणपात्रता या गुणांच्या योगानें जीवनाग्रहाची परमावधि त्याच्या ठिकाणी झालेली असल्यामुळें, त्याची प्रसविता इतर सर्व प्राण्यांहून कमी असावी हेंच साहजिक होय; आणि शिवाय, (२) मानवी जातीच्या बाबतींतही जन्म- प्रमाण आणि मृत्यु प्रमाण यांचा मेळ निसर्गाकडून ठेवला जात असला पाहिजे. म्हणजे हीं बरोबरच कमी व्हावयाचीं किंवा वाढावयाची असाच निसर्गाचा नियम असला पाहिजे.
 या दोन गोष्टींपैकी पहिली पेक्षां दुसरीच आपल्या प्रस्तुत विषयाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. कारण तिच्यावरून हैं स्पष्ट होतें, की बहुप्रसविता ही नेहमींच सुपरिणामी असते असें नसून एका विवक्षित मर्यादेच्या पलीकडे तिच्यापासून मृत्युबाहुल्य व कुप्रजाजनन याखेरीज दुसऱ्या कशाचीच प्राप्ती होत नाहीं. कोणत्याही प्राण्याच्या ठायीं उत्पादनशक्ति निसर्गाने कशासाठी ठेवलेली असते ? तर त्या प्राण्याच्या जातीची परंपरा कायम रहावी म्हणून. अर्थात्, या