पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संतति-नियमन

अधिक दुर्बल होत चालली आहे, आणि हिंदुस्थानांतील मृत्युसंख्याही फार आहे हें सर्व खरें; परंतु या गोष्टीचे फारसें भय मानण्याचें कारण नाहीं. हिंदी प्रजा नष्ट होण्याविषयींची शंका तर अगदींच वेडेपणाची आहे. कारण आपल्या देशांत मृत्युसंख्येचे प्रमाण अधिक असले तरी त्याप्रमाणेंच जननसंख्येचेंही प्रमाण मोठें आहे. सेन्सस रिपोर्टात मुंबई इलाख्यांतील १९१५ ते १९२० ची दरहजारी जनन- संख्येची सरासरी ३३.६६ व सबंद हिंदुस्थानची ३५.९७ दिलेली आढळते. एक रशियाची गोष्ट सोडली तर जननसंख्येचें इतकें मोठें प्रमाण दुसऱ्या कोणत्याच देशांत सांपडणार नाहीं. हिंदी प्रजेपैकी मृत्युमुखी पडणाऱ्यांची जागा अशा रीतीनें सारखी भरून निघतच असल्यामुळें हिंदी प्रजा नामशेष होण्याची भीति सर्वथैव अनाठायीं आहे. शिवाय १८९१ पासून १९२१ पर्यंत हिंदुस्थानची लोक- संख्या जवळ जवळ सव्वातीन कोटींनी वाढली आहे. यावरूनही हिंदी राष्ट्राविषयीं काळजी करण्याचें कारण नाहीं हीच गोष्ट उघड होईल.
 अशा रीतीचा युक्तिवाद एखाद्याला करावासा वाटेल; परंतु हा युक्तिवाद सर्वथैव चुकीचा आहे. या युक्तिवादांत कोणकोणत्या भ्रामक व तर्कशून्य कल्पना भरलेल्या आहेत त्याची खुलासेवार चर्चा आम्ही पुढें एका प्रकरणांत करणारच आहोत, तेव्हां या ठिकाणी त्याचा संक्षेपतः विचार करूं. कोणत्याही देशाची विवक्षित काळची लोकसंख्येची वाढ जन्मांच्या प्रमाणांतून मृत्यूचें प्रमाण वजा देऊन ठरवावयाची असते, व या सामान्य गणिताच्या नियमा- प्रमार्णे पहातां हिंदी प्रजेची संख्या वाढत असल्याचे दिसून येतें यांत संशय नाहीं. पण या बाबतीत केवळ दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर कांहीं तरी संख्या शिल्लक रहाते कीं नाहीं येवढेच पहाण्याचा प्रश्न नाहीं. एखाद्या देशांत खूप लोक मरतात व खूप लोक जन्मास येतात, व दुसऱ्या एका देशांत थोडेच लोक