पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बारक्याचा आठवा वाढदिवस. वय वाढलंय पण अंगावर मूठभर मांस नाही. दिवसभर नुसती वळवळ. त्याला आवडतो म्हणून मंगलताईंनी शिरा केला. कसंबसं दोन घास खाऊन तो हुंडारायला गेला.

 ताईंनी फणी घेतली आणि आरशासमोर आल्या. केस न्याहाळायला लागल्या. एक पांढरा केस दिसला, झटदिशी उपटला. मग केस विचरायला लागल्या. शेजारणीनी बारक्याला मोठी कॅडबरी घेतली होती. तिच्या लग्नाला ८ वर्ष झाली तरी पोर नव्हतं. बारक्यावर खूप माया होती. बारक्याला बाजारात नेऊन एखादी पँट घ्यायची होती. बरेच दिवस त्याचा हट्ट चालला होता. जुन्या सर्व चड्ड्या घट्ट झाल्या होत्या. पण काय करणार, देणी देता देताच बटवा रिकामा होत होता. अजूनही ३००रुपये किराण्याचं देणं बाकी होतंच. आणि वेगळा खर्च कुठून करायचा? त्याचा बा असता तर...विचार मनात येताच त्यांनी खसदिशी फणी केसातून ओढली. अजून आशा जात नाही, की तो परत येईल. मन निक्षून सांगत होतं, की तो परत येणार नाही. ज्याच्याशी तू संसार केला तो कोण होता? त्याच्या मनात काय होतं, हे तुला दहा वर्षांतही कळलं नाही. एक दिवस का गायब झाला हेही ठावं नाही... एकदम पोटात गोळा आला, पण हा आठवणींनी दाटून आलेला गोळा नव्हता. एकदम जुलाबाची कळ आली. फणी तशीच टेबलावर ठेवली आणि पाण्यानं डबा भरून त्या संडासला गेल्या. पाण्यावानी जुलाब. काय खाण्यात आलं? कालची खिचडी? बाहेर तर कुठं खाल्लं नव्हतं.

 पुढच्या दोन तासात सहा वेळा संडासला जावं लागलं. सहाव्या खेपेस पार गळून गेल्या होत्या. बारक्याला हाक मारायचा जोर नव्हता. कसंबसं बोलवून मेडिकलमधून गोळी आणली, अन् ती गोळी खाल्ली. आज त्याला घेऊन बाजारात जाणं शक्य नव्हतं. त्याला बघून, त्याचा उतरलेला चेहरा बघून मन कासावीस झालं. मेले जुलाब आत्ताच व्हायचे होते. कोण्या मेल्याची नजर लागली कुणास ठाऊक. संध्याकाळी निमीने

1