पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मेडिकलमधून खोकल्याचं औषध घेतलं तरी खोकला जाईना. आता रात्रीही झोप लागत नव्हती. सारखी खोकल्याची उबळ येत होती. एकदा-दोनदा खोकल्यातून रक्त पडलं. मग ताईंनी घाबरून डॉक्टरला दाखवलं. मनात आलं, की डॉक्टरला सांगावं का? की आपल्याला एचआयव्ही आहे. पण नाही सांगितलं. सगळे वस्तीतले लोक त्याच्याकडे जातात. त्याचा काही नेम नाही. बोलता बोलता बोलून जायचा. डॉक्टरनी क्षयरोगाची तपासणी करायला सांगितलं. आता मात्र ताईंचा धीर सुटला. तिथून बाहेर पडल्या व थेट निमीपाशी गेल्या. तिला सांगितलं. निमी लगेच त्यांना घेऊन हॉस्पिटलातल्या एचआयव्ही काउन्सिलरला भेटायला गेली. जुना काउन्सिलर नव्हता. ताई थोड्या हिरमुसल्या. तो जुना काउन्सिलर चांगला होता. त्याच्याजागी दुसरी कोणीतरी आली होती. तिला भेटून सर्व सांगितलं. काउन्सिलरने ताईंना क्षयरोगाच्या डॉक्टरला भेटायला सांगितलं. निघायच्या अगोदर निमीनी तिथला फोन नंबर मोबाइलमध्ये घेतला. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार छातीचा फोटो (एक्स-रे) काढला. डॉक्टरांनी दोन प्लास्टिकच्या डब्या देऊन घरी पाठवलं.

 रात्री खाकरून एका डबीत बेडकं (थुकी) गोळा केली. सकाळी उठून दुसऱ्यांदा खाकरून दुसऱ्या डबीत बेडकं गोळा केली आणि त्या दोन डब्या हॉस्पिटलात तपासणीसाठी दिल्या. दोन दिवसांनी निदान झालं. जी शंका होती ती खरी ठरली. क्षयरोग झाला होता. काउन्सिलरनी सीडी-फोरची चाचणी करायला सांगितलं. चार दिवसांनी कळलं, की सीडी-फोर ३०० झालाय.

 मंगलताई चडपडत घरी आल्या. शेजारणीकडे गेल्या. कसाबसा संयम ठेवत म्हणाल्या,"काही उपयोग झाला नाही त्या बाबाच्या औषधाचा" शेजारीण म्हणाली, "इतरांना गुण येतो. तुम्हालाच कसा काय नाही आला?" तोंडात मारल्यावानी मंगलताई परत आल्या.