पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केव्हाच उलटून गेली होती. काउन्सिलरकडे गेलं तर तो परत नावनोंदणीचं तुणतुणं वाजवणार म्हणून त्या त्याच्याकडे गेल्याच नाहीत. उत्साह वाटत होता. मनही आनंदी वाटत होतं. बारक्यालाही हा फरक जाणवत होता. तोही जास्त आनंदी होता.    

●●●

   


 दिवाळी तोंडाशी आली होती. लाडू, चकल्या केल्या. बारक्यासंगं श्रीवर्धनला जाऊन सोमजाईला साडी चढवली. फराळ ठेवला. बारक्याच्या नावाने केलेला नवस फेडला. परत आल्यावर शेजारणीला फराळ दिला. बारक्याला कपडे घेतले. कामावर मालकिणीनी साडी दिली. तेवढीच एक मंगलताईंच्या वाट्याची वर्षभराची साडी. ती पुढे कामी येईल म्हणून बाजूला ठेवली.

 भावाला मुलगी झाली. ताईंनी विचार केला, की जायला हवं. नाही गेले तर आयुष्यभर लक्षात ठेवेल. भावाला भेटायची इच्छा होती. तीनसव्वातीन वर्षांनंतर भेटणार होता. बारक्याच्या परीक्षेचा निकाल लागला होता. सहावीत गेला होता. सुट्टी आहे तोवर जाऊन यावं म्हणून बारक्याला घेऊन गेल्या. भावाला भेटून बरं वाटलं. उसनवारीच्या पैशातून मुलीला छुमछुम घेतलं. भावाला पाकिटात पैसे दिले. भावजयीला साडी घेतली. नेहमीप्रमाणे ती काही धड बोलली नाही. तीन दिवस राहू असं ठरवून गेलेल्या दोन दिवसांनीच परत निघाल्या. जातेवेळी भावजयीनं बारक्याच्या हातात पंधरा-वीस रुपयाचं खेळणं ठेवलं. कोणाच्या नकळत मंगलताईंनी ते खेळणं बॅगेतून काढून तिथंच ठेवून आल्या.

 घरी निघतेवेळी थकवा जाणवत होता. आल्यावर खोकला सुरू झाला. ताईंनी थोडं दुर्लक्ष केलं. खोकला जाईल, पण नाही.