पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध अंगांत धमक असेल त्यानें द्विदल पद्धतीच्या द्वारा देखील लोककल्याण साधण्यांत पाप नाही, असा शास्त्रार्थ या तडजोडींतून बाहेर पडला आहे. एतावता, रिफॉर्म्स अॅक्ट जो पदरांत पडला आहे त्याचा शक्य तितका फायदा घ्या आणि त्यांत नस- लेले अधिकार मिळविण्याकडे त्या सत्तेचा उपयोग करा, जें तत्त्व लोक- मान्यांनीं अमृतसरला प्रस्थापित करून घेतलें त्याच तत्त्वाला साबरमतीच्या करारानें दुजोरा मिळत आहे. तथापि अमृतसर दूर आहे हे विसरून चालणार नाहीं. राजकारणाची गाडी प्रतिसहकारपक्षाच्या रुळावर आणणे आणि काँग्रेसमध्ये सर्व राजकीय पक्षांचा समावेश करणें असें जें आमचें दुहेरी ध्येय आहे, त्यांतल्या सर्व पक्षांची एकी घड- वून आणण्याचा भाग अद्यापि चर्चेतहि आला नाहीं. पंडित मालवीयजी यांनी गांधींजींना जो कळकळीचा व बहुमोल संदेश पाठविला होता त्याची थोडीशी चर्चा होऊन मुंबईस नवीन स्थापन झालेल्या नॅशनॅलिस्ट पक्षासहि ऑ. इं. काँ. कमिटीच्या वेळी पाचरण करावें असें ठरून श्रीमती सरोजिनीबाईनी तसे निमंत्रण दिले आहे आणि पंडित मोतीलाल यांची निवळलेली वृत्ति आणि महात्माजींची एकी घडवून आणण्याविषयींची कळकळ लक्षांत घेतां या नॅशनॅलिस्ट पक्षासहि काँग्रेसमध्ये येण्याला आडकाठी न राहील अशी तडजोड निघणारच नाहीं असें नाहीं. तडजोड फेटाळल्यास काँग्रेसचीच इभ्रत जाईल तरी पण ऑ. इं. कॉ. कमिटीची बैठक ता. ५ व ६ रोजी होणार आहे तीत कट्टर पक्षाचा वारा कोणीकडे वाहू लागेल कोणी सांगावें ! महात्मा गांधी, पंडित नेहरू व खुद्द कानपूर काँग्रेसच्या अध्यक्षीणबाई इतक्यांनी जी तडजोड घडून यावी म्हणून बुद्धिपुरःसर प्रयत्न केले त्या तडजोडीवर बोळा फिरविणारे कांहीं कडक सोंवळे असहकारितावादी निघणार नाहींत असें नाहीं; परंतु साबर- मतीस विचारपूर्वक ठरविलेली ही नवी योजना जरकरतां ऑ. इं. कॉ. कमिटीत फेटाळली गेली तर त्यांत काँग्रेसच्याच इभ्रतीला धक्का बसणार आहे. प्रतिसहकार. पक्ष व नॅशनॅलिस्ट पक्ष हे आपआपल्या भूमिकेवर स्थिर आहेत. त्यांना हा करार ऑ. इं. कॉ. कमिटीनें मान्य केला वा न केला तरी स्वपक्षाच्या दृष्टीने विशेष महत्त्व नाही. परंतु काँग्रेसचें वजन राखावयाचें असेल तर तिनें या उभय पक्षांना आपणांत समाविष्ट करून घेतले पाहिजे. तसे न होईल तर राष्ट्रीय सभेचें राष्ट्रीयत्व केवळ नामधारी राहील याचा पोक्त विचार करून ऑ. इं. कॉ. कमिटीतील सभासद आपले मत देतील असा आम्हांस भरंवसा वाढतो.