पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परमार्थावे फळ पुढील जन्मात मिळणार असेल तर त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही, असे ते स्पष्ट म्हणत." मुखी नाम, हाती मोक्ष". ईजसेवा हीच जनसेवा असाही त्यांचा सिद्धांत होता. सर्व संत हेच करतात. तेच मानव जातीची इतर समाजसेवकापेक्षा जास्त सेवा करतात असे ते म्हणत. स्वतः तरणे व दुसऱ्यास तारणें, हेच संताचे ध्येय. आजवर होऊन गेलेल्या संतानी हेच केले.

 "अवघाची संसार सुखाचा करीन " ही ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा होती व त्याप्रमाणे त्यांनी जगाला आनंदाचे आवार घालण्याचा प्रयत्न केला. तुकाराम तर सांगतात की, "मार्ग जन्मोजन्मी आपण हेंच करीत आलों ते म्हणजे दुःखितांचे दुःख निवारण". रामदासानीही “अवघेचि सुखी असावे ". या एकाच हेतूने रामकथा ब्रह्मांड भेदून पलीकडे नेण्याचा उद्योग केला. तात्पर्य, संत जगासाठी, जगाच्या सुवासाठीच जगतात. त्यांनी राष्ट्रासाठी, समाजासाठी काय केले हा प्रश्नच खरोखर अप्रस्तूत आहे असे गुरुदेव रानडे म्हणत.

 मनुष्याला क्षणाक्षणाला देवाची आठवण करून देणे ही मानत्र जातीची सर्वश्रेष्ठ सेवा असून सर्व संत ती करीत आले अहेत. ईश्वर- सेवा हीच खरी जनसेवा. जगाला भक्तीच्या वाटेस लावणे यापरता श्रेष्ठ कर्मयोग नाही असे ते सांगत.

 नामस्मरणावर त्यांची पराकाष्टेची श्रद्धा होती. ते म्हणत, “नामस्मरणाने देवाची कृपा उत्पन्न होईल. ती कोठे, कोणाव्या आणि वशी प्रत्ययाला येईल ते कसे सांगावे ?"

गुरुदेवांची गुरुभक्ती

 रामभाऊनी १९०१ साली श्री भाऊसाहेब महाराजाकडून मनुग्रह घेतला. तेव्हांपासून देह ठेवीपर्यंत म्हणजे १९५७ सालापर्यंत सतत ५६ वर्षे गुरुसेवेचे वृत अखंड आणि एकनिष्ठेने आचरलें. अगदी बालवयात त्यांनी गुरु केल्यामुळे त्यांची गुरुभक्ती सुरवातीला सकाम होती. तसेच ती तितकीशी डोळसही नव्हती. असणेही शक्य नव्हते.

10