पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ७. ज्ञात ( न जाणलेला ), विज्ञाता (जाणणारा). याहून दुसरा द्रष्टा नाहीं, याहून दुसरा श्रोता नाहीं, याहून दुसरा मन्ता नाहीं, याहून दुसरा विज्ञाता नाहीं. तो हा तुझा आत्मा अन्तर्यामी मरणधर्मरहित आहे. त्याहून भिन्न सर्व गोष्टी आर्त (विनाशी ) आहेत. हें ऐकून आरुणी उद्दालक स्तब्ध झाला. भाष्य - पृथ्वी आदिकरून मोठ्या समर्थ देवता असून, त्या देखील मनुष्यादिकांप्रमाणें त्यांचे ठिकाणी राहणारा व त्यांचें नियमन करणारा अंतर्यामी जाणत नाहीत, असें कां, तें श्रुति ह्मणते-अदृष्ट ह्मणजे न पाहिलेला-कोणाच्याही डोळ्यांना गोचर होत नाही, परंतु स्वतः अगदी डोळ्यांत जवळ असल्यामुळे दृष्टिस्वरूप अत एव द्रष्टा आहे. त्याचप्रमाणें अश्रुत ह्मणजे कोणाच्याही कानाला गोचर होत नाहीं; पण त्याचें स्वतःचें ऐकण्याचे शक्तीचा लोप होत नाहीं, व सर्वांच्या कानांत सन्निध असल्यामुळे तो श्रोता. तसेंच अमत ह्मणजे ( कोणाचेही ) मनाचे संकल्पांत येत नाहीं; सर्व मनुष्यें पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टींचा संकल्प करितात. हा पाहिलेला व ऐकलेला नसल्यामुळे अमत होय; पण त्याची मनन शक्ति लुप्त होत नाहीं; व सर्व मनांना तो जवळच आहे ह्मणून त्याला मन्ता ह्मटलें आहे. तसेंच अविज्ञात ह्मणजें रूप, सुख इत्यादिकां - प्रमाणे ज्याच्याविषयीं निश्चय होत नाहीं; तरी त्याची स्वतःची विज्ञानशक्ति लुप्त होत नसल्यामुळे व तो विज्ञानाला ( आत्म्याला ) जवळ असल्यामुळे त्याला विज्ञाता ह्मणावें. आतां ज्याला पृथ्वी जाणत नाहीं, व ज्याला सर्व भूतें जाणत नाहींत, या ह्मणण्यावरून नियमन करण्यास योग्य असे दुसरे विज्ञाते आहेत, व नियमन करणारा अन्तर्यामी पृथक् आहे, असें आलें. ( ह्रीं दोन्ही ) पृथक् पृथक् असल्याची शंका दूर व्हावी ह्मणून श्रुति ह्मणते—याहून ह्मणजे अन्तर्यामीहून पृथक् द्रष्टा नाहीं. तसेंच त्याहून दुसरा श्रोता नाहीं. त्याहून दुसरा मन्ता नाही. त्याहून दुसरा विज्ञाता नाहीं. ज्याहून दुसरा द्रष्टा, श्रोता, मन्ता, विज्ञाता नाहीं, व जो अदृष्ट, द्रष्टा; अश्रुत, श्रोता; अमत, मन्ता; अविज्ञात, विज्ञाता; अमृत ह्मणजे सर्व संसारधर्म- रहित; सर्व संसारी जनांच्या कर्माच्या फलांची वांटणी करणारा आहे; तो हा तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत होय. या ईश्वर परमात्म्याहून भिन्न जें कांहीं आहे तें आर्त (विनाशी ) आहे. इतकें ऐकून आरुणि उद्दालक स्वस्थ बसला. अध्याय ३, ब्राह्मण ७, समाप्त.