पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. त्यांना शासन करण्याचा अधिकार आह्मांला आहे; कारण आमीं संन्यास धारण केला आहे. नित्यानंद-तुमचे गांवचा तुकाराम जातीचा शूद्र असून वेदांतील वाक्ये कवितारूपाने जे आहे तें लोकांपुढे ह्मणून दाखवितो. "कर्मधर्म त्याचा झाला नारायण' असे म्हणतो. आज वशिष्ठवामदेवांनी जी कर्ममार्गाची स्थापना केली आहे तिचा हा उच्छेद करण्याचा प्रयत्न करीत आहे. यास्तव याला शिक्षा झालीच पाहिजे. रामेश्वर-यांचे बरोबर दादोजी कोंडदेव यांना पत्र देऊन यांनां रवाना करतो. त्यांनी यांची दाद घेऊन तुकारामास शिक्षा केली तर बरें, नाही तर आह्मी हे प्रकरण शिवाजीमहाराजांकडे नेऊं. त्यांनी योग्य न्याय केला तर बरें, नाहीतर आह्मी परमपूज्य श्रीमच्छंकराचार्य यांच्याकडे जाऊन शिवाजी, दादोजी कोंडदेव, आणखी तुकाराम या त्रिवर्गानां श्रीचे दंडास पात्र करूं. वाघोलीच्या पाटलाकडून आह्मी देहूचे पाटलास ताकीदपत्र पाठवितों की, तुमचे गांवांतील तुकाराम आवळे, जातीचा शूद्र, यास गांवाबाहेर काढून द्यावे नाही तर तुमचे गांवचा व आमचे गांवचा भाईचारा राहणार नाही. सदानंद-यानेच बहुतेक काम होणार आहे. आतां तुकाराम प्रथम वाघुलीचे पाटलाकडे येईल. त्या वेळी तुह्मीं तेथें जवळ असावें. तुम्हांस वाटेल तें शासन करण्यास तुम्ही पाटलास आज्ञा करावी. नित्यानंद-त्यास शिक्षा ह्मणून इतकीच की, त्याने आजपावेंतो जे अभंग लिहिलेले आहेत, त्यांच्या वह्या त्याने एक तर जाळून टाकणे, नाही तर इंद्रायणीचे डोहांत बुडवून टाकणे. पुनः अभंग करणार नाही अशी शपथ घेणे. रामेश्वर-फार चांगलें. जशी श्रीपादांची आज्ञा असेल तसें करतो. मला वाटते आपली ही शिक्षा फारच सौम्य आहे. कसे मंबाजीबोआ ?