पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि मालक या उभयतांचाही पैसा, श्रम व वेळ यांची अमाप नासाडी झाली. या गरीब शेतकरीवर्गाने-मग तो कूळ असो की मालक असो, आपल्या घरातील गाडगोमडकी मोडून हे तंटे लढविले आणि वकील, सरकारी नोकर इत्यादी मध्यमवर्गाची घरे आयत्या प्राप्तीने भरण्यास मदत केली. (३) या गरीब शेतकऱ्यांच्या घरातून लक्ष्मी गेली; पण ती पुन्हा येण्याची काही वाट होती का? (अ) जमिनी 'तंट्यात पडल्यामुळे मालकाला कुळाकडून खंड मिळणे जवळजवळ बंदच पडले. यामुळे मालक कंगाल झाले. (ब) कुळाला वेळप्रसंगी उपयोगी पडणाऱ्या मालकाऐवजी सरकारची मदत मिळेल, तर तीही नाही. कारण कुळाच्या ताब्यात जमीन असणार एकूण दोन किंवा तीन एकर. नियमाप्रमाणे या कुळाला क्रेडिट को. ऑ. सोसायटीकडून कर्ज मंजूर होणार एकरी वीस रुपये या प्रमाणात एकूण साठ रुपये. शेअरखरेदी, किरकोळ चहापाणी यात आधीचे दहा रुपये तरी खर्च होतात. राहिलेल्या पन्नास रुपयात हे कूळ जमिनीची मशागत ती काय करणार आणि त्यामुळे त्याची उत्पादनशक्ती वाढून राष्ट्रीय उत्पन्नात भर ती काय पडणार ! फैजपुरातील क्रेडिट को. ऑ. सोसायटीचा अनुभव तर असाच आहे की, निम्म्याच्या वर कर्जे घरातील अडीअडचणी निवारण्यासाठीच शेतकरी खर्च करीत असतात. नव्हे, परिस्थिती तसे करण्यास त्यांना भाग पाडत असते. गरीब कूळ आणि गरीब मालक या दोघांनाही अधिक गरीब करून सोडणारा हा कूळकायदा कोणत्या अर्थाने पुरोगामी समजायचा याचा निर्णय आता जाणकरांनीच घ्यावा. फैजपूरचे चित्र याबाबत मात्र निराशाजनक आहे.

दुसरा घटक विणकर

बहुसंख्य गरीब शेतकरी वर्गाची स्थिती फैजपुरात स्वातंत्र्योत्तर काळात याप्रमाणे खालावलेली आहे. लोकसंख्येत या शेतकरी वर्गाच्या खालोखाल विणकर समाजाचे प्रमाण अधिक आहे. या धंद्यावर आज फैजपुरात सुमारे पाचशे कुटुंबे म्हणजे दोन ते अडीच हजार माणसे जगत आहेत. गावात सुमारे पाचशे माग आहेत. १९२२ पासून येथे ‘फैजपूर विणकर को-ऑपरेटिव्ह सोसायटी' स्थापन झालेली असून त्या मार्फत तीनशे माग सध्या चालू आहेत. स्वतंत्र्योत्तर काळात सहकारी चळवळीला उठाव आणावा या उद्देशाने गावात आणखी दोन सोसायट्या स्थापन करण्यात आल्या. त्यामध्ये शंभरएक माग नोंदले गेले. उरलेले शंभर पूर्ण खाजगीरीत्याच चालविले जात आहेत; परंतु स्वातंत्र्योत्तर काळात नोंदलेल्या दोन्ही सोसायट्या बंदच पडलेल्या असल्यामुळे त्यातील सर्व माग खाजगी स्वरूपातच चालविले जात आहेत; म्हणजे जुन्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ३०० व खाजगी २०० अशी फैजपुरातील मागांची आजची खरी विभागणी आहे.

। २६ ।