पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खेरीज रहाणार नाही. मागचा इतिहास याला साक्षी आहे. इतिहासाची ही पुनरावृत्ती होण्याची अट मात्र एक. येथल्या लोकजागृतीत वर सांगितल्याप्रमाणे एक विशिष्ट संयम व व्यवस्था जमली तर महाराष्ट्राच्या इतिहासाची पाने पुन्हा वेगाने फडफडू लागतील यात मुळीच शंका नाही.

*

जून १९६१


परिशिष्ट एक

 प्रिय श्री. विठ्ठलराव भोईटे

 स. न. वि. वि.

 आपण वाईहून सातारामार्गे फलटणला बैठकीसाठी येण्याचे ठरविले व मी वाईहून परस्परच फलटणला आलो. मला गाडी मिळाल्याने मी वेळेवर फलटण गाठले. पण लग्नसराईमुळे आपल्याला एस. टी. काही मिळाली नाही. बैठकीला तर दुपारी ३ वाजता हजर राहणे जरूरच होते. आपण सायकल घेतलीत. आणि रणरणत्या उन्हातून २० मैल सायकलपीट करून बैठकीला हजर राहिलात. मी थक्कच झालो आपले कष्ट पाहून! चार-पाच दिवस आपल्यासंबंधी जे जे ऐकत होतो ते खरेच असले पाहिजे असा चटकन प्रत्यय आला. आपण दोन-दोन दिवस अन्नपाण्यावाचून काढता; कामाच्या ओढीमुळे दोन-दोन महिने घराच्या बाहेर असता; कधी झोप आहे तर कधी आलोचन जाग्रण अशी स्थिती ! आपली कष्ट करण्याची ताकद खरोखरच अफाट आहे.

कष्टाबरोबरच धडाडी हा गुणही आपल्याजववळ भरपूर प्रमाणात आहे. आपल्या जीवनयात्रेची सुरुवात एक प्राथमिक शिक्षक म्हणून झाली. आज आपण 'विशेष भागशिक्षणाधिकारी' हे पद भूषवीत आहात. धडाडीने अनेक कामे अंगावर घेऊन ती पुरी करायची ही आपली जिद्दच आपल्या आजवरच्या प्रगतीला कारण झालेली आहे.

। १६ ।