पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिषदांना हलवावे, असे करताना प्रस्थापित हितसंबंधांशी मुकाबला करण्याचा प्रसंगआला तर त्याचीही तयारी ठेवावी, एवढा एकच मार्ग समोर दिसतो आणि माजगावकरांचे आवाहनही तोच मार्ग धरावा असे आहे.

 माजगावकरांचे पुस्तक प्रभावी आहे यात शंका नाही. विचार करणाऱ्या माणसाचे लक्ष ग्रामीण समस्यांकडे वेधून घेण्याची फार मोठी कामगिरी ते करीत आहेत. हे करताना माजगावकरांचे साहित्यगुणही विशेषत्वाने चमकतात. तजेलदार भाषा, स्फोटक वर्णन, भेदक उपरोध, नाट्यमय प्रारंभ व शेवट हे सगळे त्यात आहे. शिवाय मौलिक विचार आहेत आणि शुद्ध भावकाव्यही कुठेकुठे आहे. काही विशिष्ट अनुभव व्यक्त करायला आपण कवी नाही याची खंत त्यांनी एका ठिकाणी प्रकट केलेली आहे ; पण अगोदरच्याच ओळीत ‘समाधानाचे कढ' असा निखालस काव्यमय शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. रात्री रानात एकटेच पडल्यापडल्या त्यांना तारकांनी खचलेले आकाश दिसते आणि ते म्हणतात, 'किती युगे उलटली. व्याधाला अजून आपला नेम साधता येत नव्हता. अरुंधतीला सप्तर्षीच्या समीप जाता येत नव्हते. आकाशगंगा फेसाळून वाहत होती आणि तिच्या तीरावर सुरू असलेली ध्रुवाची तपश्चर्या अजून संपलेली नव्हती.' माजगावकरांना माहीतच असेल की, ग्रीसमधल्या एका जुन्या मातीच्या भांड्यावरची चित्रे पाहून इंग्रज कवी कास यालाही असेच काही वाटले होते. आपल्या प्रेयसीमागे तिचा अनुनय करीत धावणाऱ्या एका प्रेमिकाचे ते चित्र होते. तो तसाच जगाच्या अंतापर्यंत धावणार आहे आणि ती तशीच त्याच्यापासून दूर रहाणार आहे. आपल ज श्रेयस असते त्याचा आणि आपला संबंध असाच असतो. तरी अनुनय अपरिहार्य असतोच. आणि तपश्चर्याही. माजगाकरांच्या तळमळीतून ध्वनित होते ते या तपश्चर्यचच आवाहन.


*



[१९७५; मुंबई आकाशवाणीवर दिलेले भाषण थोडे फेरफार करून ]
। १८१ ।