पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बहुतेक काहीतरी अडकवलेलं असावं. आता नीटसं आठवत नाही. हसतही मोठा छान होता-मोकळा, झुळझुळणाऱ्या स्वच्छ झऱ्यासारखा. चित्रकार असतो तर हे हास्य कागदावर उतरविण्यासाठी जिवाचे रान केले असते.

एखादी व्यथा, अडचण तो सांगे आणि चटकन हसून मोकळाही होऊन जाई. चिंंता करण्यासारखे खूप होते. पण चिंंतेपासून तो मुक्तही वाटत होता. ही विद्या त्याला कोणी शिकवली असावी ? या उघड्या पहाडांनी की स्वैर वाऱ्यांनी ?

गुरांना चारा नाही, पाण्यासाठी आत्तापासूनच ती लांबलांब न्यावी लागतात. आठ-दहा आणे लिटर या भावाने दूध खाली विंंझरला नेऊन घालायचे, जे पुण्यात दीड-पावणेदोन रुपये भावाने विकले जाते. सरकार आता पाच एकर जमीन देणार म्हणते. पण रानात गुरे चारण्याचा हक्क काढून घेणार. डोंगराळ जमीन लागवडीखाली कशी आणायची ? त्यासाठी भांडवल पुरवले जावे किंवा जमीन शेतीयोग्यच करून दिली जावी. हे शक्य नाही. म्हणजे ही वस्ती उठणार. हातचा दुधाचा धंदा जाणार. उद्याची शेती अनिश्चित.

माझ्याबरोबरचा वाटाड्या महादेव कोळी होता. गळ्यात जानवे घालणे हे मोठेपणाचे लक्षण आहे अशी त्याची समजूत होती. 'आमच्यात पण जानवे घालण्याची चाल आहे, साहेब. पण सोन्याचे असले तरच आम्ही घालतो,' असे त्याने मला वाटेत सांगितले होते. 'कधी पाहिले आहेस का सोन्याचे जानवे ?' मी त्याला थट्टत विचारले होते. आजोबांच्या वेळी घरात होते म्हणाला. त्याची आज ही अवस्था. येणाऱ्या जाणाऱ्याला सिंहगडची खरीखोटी माहिती सांगून जेमतेम पोट भरायचे. शेतीवाडी होती ती दुष्काळात गेली. चार-चार रुपयाला दुभती गाय त्या काळात काढावी लागल्याचे त्याला अजूनही वाईट वाटत होते. तसे हे कोळी आदिवासीच. मावळात यांची वस्ती बरीच आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हारचा राजा महादेव कोळ्यांपैकीच. तसेच हे धनगर. मला आपले वाटून गेले, 'धनागर' या शब्दाचा धनगर अपभ्रंश असावा. एके काळी ही कुटुंबे म्हणजे धनाची आगरे असावीत. यांची ती श्रीमंती कुठे, कशी आणि केव्हा आटून गेली ते समजत नाही. सिंहगडच्या पश्चिम उतारावरच केवळ दहा-बारा धनगरवाड्या आज आहेत. हळूहळू त्याही ओस पडताहेत.

समोरच्या डोंगरावर निलगिरीची लागवड झालेली दिसते आहे. नुकतेच कुठेतरी वाचले, कोरड्या भागात ही लागवड हानिकारक आहे. ही वनस्पती पाणी फार शोषून घेते. लवकर वाढते हा एकच फायदा जंगलखात्याने विचारात घेतलेला दिसतो. लाकूड म्हणून उपयोगही कमी. इथेही वेगळा, स्वतंत्र विचार असू नये ?

। १२१ ।