पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरकार हे असे आंधळे, आम्ही लोक पांगळे. कुणाला मुळातच पाय नाहीत. बहुतेक पाय असूनही न चालू शकणारे. बुद्धी आणि श्रम यांचा कुठे मेळच नाही. त्यामुळे सर्व समाजालाच आलेलं हे पांगुळपण !

कितीतरी वेळ हा सिंहगडच आज पाठीमागून पाहतो आहे ! अगदी बेढब दिसतो. इकडून पाहात असता यावर इतिहास घडला असेल, हे मानायला मन तयार होत नाही. पुण्याकडून हाच पहाड कसा किल्ला म्हणून डोळ्यात भरतो ! पाय पसरून रखवालीसाठी ताठ बसून असलेल्या एखाद्या इमानी जनावरासारखा ! आणखी खूप वर्षे हा असाच येथे उन्हापावसात तापत, भिजत, धुपत बसून राहील. ज्याची रखवाली याने वास्तविक करायची तो माणूस येथून अदृश्य झाला तरी !

नाही. पण हेही भाग्य याला लाभणार नाही. हवा खाण्याचे ठिकाण म्हणून या परिसराचा विकास करण्याच्या योजना आहेत. म्हणजे लवकरच येथे पुण्या-मुंबईच्या नवश्रीमंतांचा गजबजाट वाढणार. कॉन्व्हेन्टमधील मुले आपल्या बापाला विचारणार, 'डॅडी, हू वॉज धिस तानाजी ?' डॅडी सांगणार, ' डोन्च्यु नो ? ही वॉज ए ब्रेव्ह लेफ्टनंट ऑफ शिवाजी'....

अरे! कम से कम येथे भात संशोधन केंद्र तरी काढा ! देशी खेळांसाठी एखादी ॲकेडेमी ! फुप्फुसाचे विकार बरे करणाऱ्या एखाद्या सुसज्ज रुग्णालयासाठी हा परिसर उत्तम आहे. हवापाण्यानेच निम्मा विकार बरा होईल. गांधीजींच्या उपोषणकाळात येथल्या देवटाक्याचे पाणी त्यांच्यासाठी खास नेले जात होते ना ? मोठे औषधी आहे हे पाणी असे म्हणतात.

धार काढण्याची ही वेळ नव्हती. पण बाबुराव धनगराने त्या इरसाल मुलाला हे काम सांगितले. पितळेचे स्वच्छ तांब्या भरून धारोष्ण दूध माझ्यासमोर ठेवले गेले. मला तर दूधाचे अगदी वावडे. जेमतेम भांडे-अर्धा भांडे घेतले आणि उरलेले सर्वाना घोट घोट दिले. कारण तोपर्यंत आणखी तीन-चार माणसे जमलेली होती. पलीकडच्या वस्तीवरचा असाच एक धनगर, कुणी सुतारकाम करणारा बलुतेदार, दोन-तीन एकरवाला एक शेतकरी, कामावरून मधूनच परतलेल्या या वस्तीवरच्या दोन-तीन स्त्रिया...

वाटाड्याने घाई केली नसती तर हत्तीदांड धनगरवस्तीवरील ही बैठक आणखीही खूप वेळ चालली असती.

*

फेब्रुवारी १९७०

। १२२ ।