Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

की, मुंबईला येऊन त्यांनी एखाद्या जाहीर सभेत गोदी-कामगारांना हे आवाहन करावे. गांधी जन्मशताब्दी-२ ऑक्टोबर १९६९-ही अखेरची मुदत असावी. जयप्रकाशजींची यालाही तयारी होती. इतकेच नाही तर जॉर्ज, एस्. एम्. वगैरेंना सांगून हे आवाहन प्रत्यक्षात उतरविण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. जाहीर सभेचा थोडाफार तपशीलही ठरला. इतक्यात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, दा. न. शिखरे वगैरे मंडळी भेटीसाठी आत आली व हा विषय अर्धवटच राहिला.

वास्तविक पत्रव्यवहाराने मी हा विषय पुरा करू शकलो असतो. पण अधिक विचार करता त्यातील एक अपूर्णता माझी मलाच जाणवत होती. समजा, गोदीकामगारांनी परदेशी धान्य उतरवून घेण्यास नकार दिला! सरकार थोडेच हे सहन करणार? काहीतरी कारवाई होणारच. कोणाचे पगार कापले जातील, तात्पुरत्या कामगारांना कदाचित पुन्हा कामावर घेतले जाणार नाही, खटले होतील, नोकरीवर काहीतरी परिणाम होईल. दिल्लीची आजची अवस्था पाहता असे काही कडक उपाय योजले जातील ही शक्यता कमी असली तरी अगदीच डोळयाआडही करता येत नाही. मग प्रश्न असा की, कामगारांना ' हे सहन करण्याची तयारी ठेवा,' असे सांगण्याचा नैतिक अधिकार इतरांना केव्हा पोचू शकतो? कामगारांच्या बरोबरीने इतरांनीही अशी तयारी ठेवल्यानंतर ! जो न्याय कामगारांना, तोच त्यांना 'अमुक अमुक करा' असे सांगणाऱ्यांनाही लागू पडला पाहिजे. अशी नैतिक समपातळी निर्माण झाल्याशिवाय मला तरी पुढे जावेसे वाटले नाही. म्हणून जयप्रकाशजींशी पत्रव्यवहार होऊ शकला नाही. आता मी स्वीकारलेल्या करवंदी पर्यायामुळे ही अडचण दूर होईल व पुन्हा या विषयाला चालना मिळेल असे वाटते.

मी प्राप्तीकर भरला नाही म्हणजे जी कारवाई सरकार गोदी कामगारांनी असहकार पुकारल्यावर त्यांच्यावर करू शकते ती माझ्यावरही, वेगळ्या कारणास्तव का होईना, करू शकेल. जप्ती येईल, काही शिक्षा होईल, ही भोगण्याची आज तयारी हवी. तरच उद्या कामगारांना सांगता येईल, ‘मित्रांनो, आपल्या हाती विनाकारण आलेला भिकेचा वाडगा फेकून देणे तुम्हाला सहज शक्य आहे. जगभर यामुळे आपली बदनामी होत आहे. पदोपदी यामुळे आपल्याला मान खाली घालावी लागत आहे. एका नव्या स्वरूपाच्या गुलामगिरीचे पाशही आपल्याभोवती आवळले जात आहेत. जगातील साम्राज्यसत्ता वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या पायात अडकवीत असलेल्या शृंखला झुगारून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दिल्ली हे कर्तव्य आज करीत नाही. सत्तास्पर्धेच्या राजकारणात ती दंग आहे, करारमदारांच्या जाळ्यामुळे तिचे स्वातंत्र्यच मर्यादित होत आहे की काय, अशी शंका आहे. म्हणून


ग्रा....७

। ९७ ।