पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
चार शब्द

 शैला लोहियांचे हे लेखन जीवनाकडे अंतर्मुखाने पाहण्याचे भान देते. ही अनुराधा आणि श्रीनाथ यांच्या जीवनाचे विविध लयीतले सौंदर्य खऱ्या खुऱ्या अर्थाने या दीर्घ कहाणीत अवतरले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी क्षितिजावर जे विविध रंग खुलून दिसतात, ज्यात गीत, लोकगीत, सामाजिक-राजकीय जाणिवेचे असे त्यांना प्रथमपासूनच भान आहे व ते उत्तरोत्तर सूक्ष्म होत गेले आहे. शृंगाराच्या हळूवार छटा त्यांनी संयमाने रेखाटलेल्या आहेत. शिवाय या लेखिकेची प्रवृत्ती स्वच्छंदवादाला जवळची आहे, मुळात तिला काव्यात्मकतेची ओढ असल्याने ती पानोपानी अभिजात वादावर पोसली जाते. या लेखिकेची सानेगुरूजी आणि राष्ट्र सेवा दलावर अपरंपार श्रध्दा असल्याने, ती जी जीवनमूल्ये जतन करते, ती तिच्या जीवन वाटचालीत सतत सावली प्रमाणे वाहत असलेली दिसतात. कुसुमाग्रजांचे राष्ट्रवादी काव्य आपल्या जीवनानुभूतीचे बळ असल्यामुळे ही लेखिका आपल्या निवेदनात सतत या कवितेचा उल्लेख करते. आपल्या ध्येय धोरणाची 'अकरावी दिशा' शोधताना नाटयपूर्ण प्रेम गीते, निसर्ग सौंदर्याच्या कविता, लावण्या व संगीतिका आपल्या या वाटचालीतली वळणे दाखवून देतातर्.
 या प्रांजळ निवेदनाला खास अशी स्वतःची गती आहे. कुठल्याही वाङमय प्रकाराची त्याने तडजोड केली नाही. विविध पात्रे चितारताना त्यात परकाया प्रवेश करताना लेखका आपले ताटस्थ सांभाळते. आपले निवेदन मूळ आशयाशी एकरूप करते. ती स्वः सामाजिक किंवा सांस्कृतिक बांधिलकीशी निगडित असली, तरी ज्या अध्ययन-अध्यापन मूल्याशी तिचा वावर झाला त्याचे सुसंस्कारित ठसे या समग्र निवेदनावर स्पष्ट उमटले आहे. या समग्र निवेदनाचे जीवन ध्येय ती "एकाने भाकरीची सोय पहायची आणि दुसऱ्याने सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी स्वीकारून काम करायचे" हा घेतलेला निर्णय या शब्दात वर्णन करते.