पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रकरण:४


 शेतीमाला:
 अस्मानी संकट आणि सुलतानी शोषण


 आतापर्यंत आपण शेतीमालाचे उत्पादन व तो माल काढण्यासाठी येणारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च कसा काढायचा हे पाहिलं. हा खर्च शेतकऱ्याला भरून मिळत नाही हेही आपण काही आकडेवारी घेऊन पाहिलं. असं जर सातत्याने होत असेल तर त्यामागची कारणं काय आहेत हेही समजावून घ्यायला पाहिजे. ते आवश्यक आहे.
 या परिस्थितीमागं दोन प्रकारची कारणं आहेत - आस्मानी आणि सुलतानी. आपल्या पूर्वजांपासून लोक म्हणत आले आहेत की शेतकऱ्याला अस्मानी आणि सुलतानी अशा दोनही प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागतं.

 अस्मानी संकटांपैकी महत्त्वाचं संकट पावसाचं. हेही पुन्हा दोन प्रकारचं असतं. पहिला प्रकार म्हणजे पावसाचा अनिश्चितपणा. एखाद्या दिवशी पडला म्हणजे खूप पडतो आणि एखाद्या दिवशी नाही पडला म्हणजे बाबा तोंडच दाखवत नाही. बहुतेक वर्षी आपल्याला जेव्हा बदाबदा पडतो. यानं शेतकऱ्याचं नुकसान होतं. उदाहरणार्थ, निपाणी भागातल्या शेतकऱ्यांना तंबाखू वाळत घातला आणि जरा जरी पाऊस पडला तर सगळी पानं खलास होतात. पावसाच्या या लहरीपणामुळं होतं काय की पीक बुडतं. आपला खर्च झालेला असतो बंदा रुपया आणि पीक मात्र येतं त्रेपन्न पैसे. याचा अर्थ आपला सरासरी उत्पादन खर्च वाढतो. शेतकऱ्याला संकटात आणणारा पावसाचा दुसरा गुण म्हणजे त्याचा आपल्या देशातील हंगामीपणा. आपल्याकडे सगळा पाऊस जवळ जवळ चारच महिन्यांत पडतो आणि ज्याला

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ४०