पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जगातलं संपत चाललं आहे. (वरखतं मिळेनाशी झाली तर आपण कोणत्या प्रकारची शेती करणार आहोत? हा मोठा चर्चेचा विषय आहे.) कोणतंही सरकार आलं तरी पेट्रोलियमचे सर्व पदार्थ महागच करावे लागणार. किती वेळा अनुदानं मागत बसणर? प्रत्येक वर्षी पेट्रोलियम उत्पादनांचे भाव वाढले की काय आंदोलने करीत बसणार? त्यापेक्षा 'तुम्ही काहीही वाढवा. आम्ही जे काही खर्च करू ते लक्षात घेऊन आम्ही जो काय भाव काढू तो आम्हाला द्या. त्याच्यात कुठे कमी घेणार नाही.' इतकीच मागणी केली पाहिजे. त्यामुळे आंदोलनाला निश्चित दिशा येते. गेल्या १० वर्षांत पुष्कळशी युवाशक्ती अनेक चळवळीत तिला निश्चित धोरण न मिळाल्याने फुकट गेली आहे. वैफल्यग्रस्त झाली आहे. यात विद्यार्थी मंडळीचा भरणा जास्त आहे. कुठं बिहारमध्ये एका पोलीस चौकीत एका महिलेवर बलात्कार झाला, लगेच इथं बीडला तलाठी किंवा तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मोर्चा गेला आणि काढलं निवेदन, आणखी कुठे काही घडलं की पुन्हा मोर्चा, निवेदन. सहा महिने हा उत्साह टिकतो पोरांच्यात, मग पोरांना वाटतं हे काही खरं नाही. त्यातनं काही मिळत नाही आणि तो अन्याय दूर होत नाही.
 तुमच्या आंदोलनाची दिशा जेव्हा निश्चित ठरलेली आहे तेव्हा त्याच्या पलीकडे दुसरं काही टोचत असलं तरी तिकडे बघायचं नाही. टोचत नाही असं नाही; पण अर्जुनाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याला फक्त पक्ष्याचा डावा डोळा दिसत होता. डावा डोळा फोडायचा तर त्याला झाडाची पानं आणि फांद्या दिसून उपयोगाचं नव्हतं - त्याचा नेम चुकला असता.
 वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी स्त्रियांवर, हरिजन स्त्रियांवर, ग्रामीण स्त्रियांवर जे अत्याचार होत असल्याचे आपल्याला ऐकायला येते त्याचं मुख्य कारण त्यांचं दारिद्र्य आहे. हे दारिद्र्य जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत इतर गोष्टींबद्दल तुम्ही ओरडत राहिलात तर तुम्ही तुमची ताकद फुकट घालवता. देशाच्या शरीरातलं सगळं रक्त बिघडलं आहे. त्यामुळे अंगभर फोड आलेत. एकेका फोडाला मलमपट्टी करत बसून उपयोग नाही. त्यानं जरा बर वाटेल. पण एक फोड बरा होतो असं वाटतं तोवर नवीन पाच निर्माण होतात. तेव्हा तात्पुरत्या मलमपट्यांऐवजी रक्तदोषांतकच घ्यायला हवं. त्याचप्रमाणे अन्याय, दुःख यांचं निवारण करायचं असेल तर, तर त्याचं मूळ कारण दारिद्र्य आहे हे लक्षात घेतल पाहिजे आणि ते हटवायचं असेल तर इतर कोणते तरी उपाय योजण्याऐवजी शेतीमालाचा उत्पादन खर्च शास्त्रशुद्ध पद्धतीने काढून त्याप्रमाणे शेतीमालाला रास्त भाव दिले गेले पाहिजेत.

 ***

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ३९