पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शास्त्रीय उपाय योजना आखलेली आहे. शेतीमालाचा उत्पादनखर्च कृत्रिम नमुना पद्धतीने (synthic Model Method) काढला पाहिजे. सरासरीने काढून चालणार नाही. मध्यावर १५-२० फूट खोल असलेल्या नदीची सरासरी खोली चार फूट असली तरी ती घोड्यावर बसून पार करता येईल?
 कोणत्याही एका प्रकारच्या मगदुराची जमीन घेऊन खर्चाचा हिशेब काढला पाहिजे. उत्तम प्रतीची जमीन असेल तर जमिनीचा खर्च कमी असेल; परंतु मशागतीचाखुरपणीचा खर्च जास्त असेल. पीक कमी येईल. म्हणजे सरासरी खर्चात फारसा फरक पडणार नाही. उदाहरणादाखल घेतलेल्या शेतीवर कशा प्रकारे शेती करावयाची आहे? अत्याधुनिक पद्धतीने की अति सनातन पद्धतीने? आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या सामग्रीची उपलब्धता लक्षात आणि शेतकऱ्यांची कुवत लक्षात घेता या दोन टोकांच्या पद्धतीत सुवर्णमध्य साधावा लागेल. शेतीची तंत्रिक तसेच कार्यक्षमतेची एक पातळी गृहीत धरावी लागेल. ही पातळी दरवर्षी तत्त्वतः वाढवली पाहिजे, परंतु दुष्काळासारख्या प्रसंगी क्वचित उतरवावीही लागेल.
 गृहीत धरलेल्या तांत्रिक व कार्यक्षमतेच्या पातळीच्या संदर्भात कृत्रिम नमुना पद्धतीने उत्पादन खर्च काढला पाहिजे. या पातळीच्या वर असलेल्या शेतकऱ्यांना खास फायदा मिळवता येईल, खाली असलेल्यांना तोटा सहन करावा लागेल.

 कृषिमूल्य आयोग उत्पादन खर्च काढताना जमिनीच्या भाडेपट्टीचा जरूर विचार करते. पण तसा विचार करताना महसूल खात्याने जमिनीची किंमत (नुकसान भरपाईच्या दृष्टीने) ठरविलेली असते ती धरते. धरणाखाली असणाऱ्या जमिनीची भरपाई ८०० रु. एकरी असते. बाजारात मात्र या जमिनीची किंमत ८ ते १० हजार रु. एकरी असू शकते. कुठे जमिनीची प्रत, गावापासून अंतर वगैरेनुसार ती एकरी २० ते २५ हजार असू शकते. तेव्हा नमुन्यासाठी आपण जी जमीन निवडू तिची महसुलाची किंमत न धरता बाजारची किंमत धरली पाहिजे. नमुना म्हणून आपण ५००० रु. किमतीची जमीन घेतली तर मशागत, आंतरमशागतीचा खर्च वाढेल. त्याबरोबर उत्पादनही कमी येईल. जमीन गावापासून दूर असेल तर वाहतूकखर्च वाढेल. उलट जास्त किमतीची जमीन नमुना म्हणून घेतली तर मशागत, आंतरमशागतीचा खर्च कमी येईल आणि उत्पादन अधिक असेल. अशा नमुना जमिनीत आधुनिक तंत्र वापरून चांगलं बियाणं, नैसर्गिक खतं, वरखतं, औषधं किती प्रमाणात वापरली असता उत्पादन काय यायला पाहिजे याचा अंदाज घेऊन

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ३४