नेमलेली आहे. ती काय करते? देशातील ५ ते ६ हजार शेतकऱ्यांची शेतं निवडते. निवडते म्हणजे लॉटरीचे जसे नंबर काढतात तसे सर्वेनंबर काढतात. त्यामुळे यात वेगवेगळ्या गावांतील, राज्यातील शेतं निवडली जातात. कुणाचही शेत निवडलं जाण्याची शक्यता असते. या शेतातील प्रत्येक बाबीवरील खर्चाचे आकडे घेऊन त्यांची बेरीज करून सरासरी खर्च काढून एकूण सरासरी उत्पादन खर्च काढला जातो. या पद्धतीत दोष आहे. सहा हजरांपैकी साधारणपणे ५५०० शेतकरी हे गरीब, लहान शेतकरी असतात. आर्थिक दारिद्र्यामुळे त्यांना आधुनिक तंत्रांचा, वरखतांचा, औषधांचा वापर करणे शक्य होत नाही. याचा परिणाम उत्पादन खर्च काढण्यावर होतो. ही सहा हजार शेतं जर ऊस लागवडीखालील असतील तर सरासरीच्या तंत्राप्रमाणे औषध फवारणीचा खर्च हेक्टरी रु. १०.७३ येतो कारण ५५०० शेतकरी औषधफवारणी करीतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावापुढे त्या रकान्यात काहीच रक्कम नसते. उरलेल्या ५०० जणांचा खर्च सहा हजारांवर विभागला जातो आणि मग हेक्टरी १०.७३ रु. असा विचित्र आकडा येतो. आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की हेक्टरला रु. १०.७३ पाणी फवारण्यालासुद्धा पुरत नाहीत.
उत्पादन खर्च काढण्याचा सरासरी तंत्राचा दुसरा दोष असा -
ज्वारी बाजारात जाते ती कुणाची? जे शेतकरी आधुनिक तंत्र आणि वरखतं, औषधे वगैरेंचा वापर करून बरी शेती करू शकतात त्याच ६००० पैकी ५०० जणांची. उरलेले ५५०० लहान शेतकरी खर्च परवडत नसल्यामुळे फक्त घरच्यापुरती ज्वारी करतात. पण बाजारात ज्वारीची किंमत ते ज्वारी बाजारात पाठवित नाहीत अशा अधिक खर्च करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्च गृहीत धरून ठरविली जाते. त्यामुळे खर्च करणाऱ्यांचा खर्च भरून निघत नाही. आर्थिक असमर्थतेमुळे ५५०० शेतकरी चांगलं बियाणं, वरखतं, औषधं वापरत नाहीत. हा न केलेला खर्च विचारात न घेता जर त्याला किंमत देत राहिलं तर त्याची स्थिती सुधारणार कशी आणि तो आपली शेती सुधारणार कशी? कुठं तरी पाच रुपये जास्त मिळाल्याशिवाय तो वरखतं वापरणार कसा? तो खर्च करीत नाही म्हणून किंमत मिळत नाही आणि त्याला किंमत मिळत नाही म्हणून तो खर्च करू शकत नाही. अशा दुष्टचक्रात लहान शेतकरी अडकला आहे.
हे दोष टाळण्याकरता आपण शेतकरी संघटनेमध्ये उत्पादन खर्च काढताना