पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड नरिमन, फली सॅम नरिमन, फली सॅम ज्येष्ठ वकील आणि न्यायविद १० जानेवारी १९२९ फली सॅम नरिमन यांचा जन्म म्यानमारची (पूर्वीचा ब्रह्मदेश) राजधानी यांगॉन (रंगून) येथे झाला. त्यावेळी ब्रह्मदेश हा ब्रिटिशांकित भारताचाच एक भाग होता. त्यांचे वडील सॅम हे न्यू इंडिया अ‍ॅश्युअरन्स कंपनीच्या रंगून शाखेचे व्यवस्थापक होते. फली यांचे सातव्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण रंगूनलाच झाले. त्यानंतर १९४१मध्ये जपान दुसर्‍या महायुद्धात उतरला आणि जपानी हवाई दलाच्या विमानांनी रंगूनवर बाँबहल्ले सुरू केले. तेव्हा नरिमन कुटुंबाने अगोदर उत्तर ब्रह्मदेशातील मंडाले या शहरी स्थलांतर केले. नंतर रंगून पडल्यानंतर तेथे परत जाणे शक्य नसल्याने ही मंडळी आणखी उत्तरेकडे निघाली आणि रस्ते, जंगले, नद्या-नाले पार करीत, खडतर प्रवास करून भारतात आधी इंफाळ येथे पोहोचली आणि पुढे दिमापूर व कलकत्तामार्गे दिल्लीला पोहोचली. काही काळ दिल्लीत राहिल्यानंतर फली यांना शिमला (सिमला) येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये ज्युनियर केंब्रिजच्या वर्गात प्रवेश मिळाला. अगोदर ज्युनियर केंब्रिज आणि नंतर १९४४मध्ये सीनियर केंब्रिज या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी फली मुंबईला आले आणि त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. १९४८मध्ये ते सेंट झेवियर्समधून बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. फलींच्या वडिलांची इच्छा त्यांनी आयसीएसच्या परीक्षेस बसावे, अशी होती. परंतु फलींचा ओढा कायद्याकडे असल्याने त्यांनी त्यास नकार दिला आणि मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेथून १९५०मध्ये ते एलएल.बी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्याच वर्षी अ‍ॅडव्होकेटची परीक्षाही उत्तीर्ण झाले. नोव्हेंबर १९५०मध्ये त्यांनी सर जमशेदजी कांगा यांच्या हाताखाली वकिलीस सुरुवात केली. दोन दशकांहून अधिक काळ नरिमन यांना मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणेच मुंबईतील अन्य न्यायालये आणि पुणे व गोवा येथील न्यायालयांतही वकिलीचा अनुभव मिळाला. १९६७मधील प्रसिद्ध गोलकनाथ खटल्यात त्यांना सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्याची संधी मिळाली. १९७२मध्ये त्यांची नियुक्ती अतिरिक्त सॉलिसिटर-जनरल म्हणून झाल्यावर ते दिल्लीला गेले. वृत्तपत्रीय कागदावरील नियंत्रणाविरुद्ध टाइम्स ऑफ इंडियाने केंद्र सरकारविरुद्ध केलेल्या रिट याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात नरिमन यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. या याचिकेवरील न्यायालयाचा बहुमताचा निर्णय सरकारच्या विरुद्ध गेला. जून १९७५मध्ये आणीबाणी जाहीर झाल्यावर तिच्या निषेधार्थ नरिमन यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर नरिमन यांनी अनेक खटले लढवले. त्यांना अनेक सन्मान मिळाले. १९९१मध्ये ‘बार असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९९१मध्येच भारत सरकारने त्यांना शिल्पकार चरित्रकोश