पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशमुख, बाळकृष्ण नरहर न्यायपालिका खंड व्यवसायासाठी आले. मुंबई येथेही त्यांनी सहायक सरकारी वकील म्हणून काम केले. ११ जून १९६७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. वकिलांतून थेट या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक होणारे ते मराठवाड्यातील पहिलेच वकील. ८ जानेवारी १९६८ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १९ नोव्हेंंबर १९८० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली, तर ७ जानेवारी १९८१ रोजी त्यांची या पदावर कायम नियुक्ती झाली. १० ऑगस्ट १९८२ रोजी ते सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. राज्यपुनर्रचना होत असतानाच मराठवाड्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे वेगळे पीठ स्थापन व्हावे अशी तेथील जनतेची मागणी होती. परंतु ती दीर्घकाळ मान्य होऊ शकली नाही. असे पीठ स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीश आणि राज्य सरकार यांचे एकमत व्हावे लागते. तसा योग न आल्यामुळे ही मागणी प्रलंबित होती. व्यंकटराव देशपांडे मुख्य न्यायाधीश झाल्यावर त्यांनी असे पीठ औरंगाबाद येथे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला व राज्य सरकारने अनुकूलता दर्शविल्यानंतर २७ ऑगस्ट १९८१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाची स्थापना झाली. हे पीठ स्थापन करण्यास मुंबईतील काही वकील व इतरांनी विरोध दर्शविला होता. परंतु कालांतराने मराठवाड्याच्या जनतेची मोठीच सोय या पीठाने झाली असे दिसले. एका दृष्टीने न्या. देशपांडे यांनी महाराष्ट्राच्या न्यायसंस्थेत आपल्या निर्णयाने इतिहास घडविला. हे पीठ स्थापन करण्याचा त्यांचा आदेश कायदेशीर असल्याचा निर्वाळा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पुढे दिला. सेवानिवृत्तीनंतर रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांची निवड करणार्‍या समितीचे अध्यक्ष म्हणून तसेच आजारी कापडगिरण्यांच्या पुनरुज्जीवनासाठी असलेल्या त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. जून १९८४मध्ये महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पाच वर्षे हे काम केल्यानंतर ते निवृत्त झाले. सध्या त्यांचे वास्तव्य पुणे येथे आहे. - न्या. नरेंद्र चपळगावकर

देशमुख, बाळकृष्ण नरहर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश १९नोव्हेंबर१९१८-२४जानेवारी२००८ बाळकृष्ण नरहर देशमुख यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांचे वडील रावबहादूर नरहर देशमुख अहमदनगर येथे ज्येष्ठ वकील होते. बाळकृष्णांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथे म्युनिसिपल स्कूलमध्ये आणि ए.ई.सोसायटीच्या शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात आणि कायद्याचे शिक्षण पुण्याच्या आजच्या आय.एल.एस. विधि महाविद्यालयात झाले. फर्गसनमधून बी.ए. व एम.ए. आणि विधि महाविद्यालयामधून एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर ५ ऑगस्ट १९४१ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून रुजू झाले. त्यानंतर चौदा वर्षे अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात त्यांनी दिवाणी आणि फौजदारी, मूळ आणि अपील असे सर्व प्रकारचे खटले यशस्वीरीत्या लढविले. १२ एप्रिल १९५५ रोजी देशमुख यांची नियुक्ती सहायक न्यायाधीश म्हणून झाली. १९६५पर्यंत त्यांनी विविध ठिकाणी संयुक्त न्यायाधीश आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम केले. काही काळ ते मुंबई शहर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीशही होते. ७ जून १९६५ रोजी देशमुख यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. ६ जून १९६७ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. ६ ऑक्टोबर १९७८ रोजी उच्च ७६ शिल्पकार चरित्रकोश