पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारकुंडे, विठ्ठल महादेव न्यायपालिका खंड रेनेसान्स इन्स्टिट्यूट’ या संस्थेचेही अध्यक्ष होते. नंतर १९७४मध्ये ‘सिटिझन्स फॉर डेमॉक्रसी’ (सी.एफ.डी.) आणि १९७६मध्ये आणीबाणी लागू असताना ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज्’ (पी.यू.सी.एल.) या दोन संघटना जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्या; त्यांचे अध्यक्षपदही न्या.तारकुंडे यांच्याकडे चालत आले. सी.एफ.डी.ने बोहरा समाजाच्या धर्मगुरुंविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते. १९७८मध्ये जयप्रकाशांनी न्या. तारकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक निवडणूक सुधारणा समिती नेमली; या समितीने निवडणूक सुधारणांवर अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला. १९८०नंतरच्या दोन दशकांदरम्यान ‘जनहित याचिका’ या संकल्पनेचा उदय आणि विकास होऊन भारतीय न्यायव्यवस्थेचा तो एक अविभाज्य घटक बनला. वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक बिनसरकारी संघटना (नॉन-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन किंवा एन.जी.ओ.) कार्य करू लागल्या. अशा एन.जी.ओ. आणि पी.यू.सी.एल. यांच्या वतीने न्या.तारकुंडे यांनी अनेक विषयांवरील जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांत लढविल्या. दिल्लीतील १९८४च्या शीखविरोधी दंगलीनंतर भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. सिक्री आणि न्या.तारकुंडे यांच्या समितीने दिल्लीच्या अनेक भागांत फिरून ‘नागरिक चौकशी’ केली. अशीच चौकशी न्या.तारकुंडे यांनी पंजाबात आणि काश्मीर खोर्‍यातही केली. १९९०मध्ये अलीगढमध्ये दंगल झाली; त्या घटनेचीही न्या.तारकुंडे यांनी पी.यू.सी.एल. च्या अन्य सदस्यांबरोबर चौकशी केली. १९३७मध्ये एम.एन.रॉय यांनी ‘इन्डिपेन्डन्ट इंडिया वीकली’ हे साप्ताहिक कोलकात्यात सुरू केले होते. त्याचे नंतर ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ असे नामांतर झाले. न्या.तारकुंडे त्यात सुरुवातीपासूनच लिहीत असत. १९७०मध्ये ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट’चे कलकत्त्याहून दिल्लीला स्थलांतर झाले आणि त्याचे मासिकात रूपांतरही झाले. त्याच वेळी न्या.तारकुंडे त्याचे संपादक झाले. जवळजवळ एकोणतीस वर्षे, म्हणजे त्यांच्या वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत त्यांनी ही धुरा समर्थपणे व यशस्वीरीत्या सांभाळली. या मासिकातून त्यांनी विविध विषयांवर विस्तृत आणि मूलगामी लेखन नियमितपणे केले. त्यांतील निवडक लेखांचा संग्रह ‘थ्रू ह्युमॅनिस्ट आईज्’ १९९४मध्ये प्रसिद्ध झाला. १९९७मध्ये न्या.तारकुंडे वकिलीच्या व्यवसायातून निवृत्त झाले, परंतु त्यांचे लेखन आणि इतर विविध स्वरूपाचे कार्य शेवटपर्यंत चालूच होते. न्या.तारकुंडे यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९७८मध्ये ‘इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अ‍ॅन्ड एथिकल युनियन’ या संस्थेने त्यांना ‘इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अ‍ॅवॉर्ड’ देऊन त्यांचा गौरव केला. १९८४मध्ये अमेरिकेतील ‘अकॅडमी ऑफ ह्युमॅनिझम’ या संस्थेने त्यांना ‘ह्युमॅनिस्ट लॉरिएट’ हा किताब किंवा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. १९९८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला. १९९९मध्ये न्या.तारकुंडे यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘व्ही. एम. तारकुंडे ९० : अ रेस्टलेस क्रुसेडर फॉर ह्युमन फ्रीडमस्’ हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला. त्याच्या पहिल्या भागात देशभरातील अनेक नामवंंत मंडळींचे न्या.तारकुंडे यांचा गुणगौरव करणारे लेख समाविष्ट आहेत, तर दुसर्‍या भागात न्या.तारकुंडे यांचे विविध महत्त्वाच्या विषयांवरील निवडक लेख आहेत. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. राणे, एस.ए.; संपा.,‘व्ही.एम.तारकुंडे ९० : अ रेस्टलेस क्रुसेडर फॉर ह्यूमन फ्रीडम्स’; इंडियन रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन, मुंबई शाखा, १९९९.

शिल्पकार चरित्रकोश ७०