पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तय्यबजी, बद्रुद्दीन न्यायपालिका खंड तय्यबजी, बद्रुद्दीन पहिले भारतीय बॅरिस्टर ८ ऑक्टोबर १८४४ - १९ ऑगस्ट १९०६ बद्रुद्दीन तय्यबजी यांचे नाव बव्हंशी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यामुळे लोकांना माहीत आहे. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला हेही माहीत आहे. परंतु भारतात इंग्रजी राजवट स्थिर झाल्यानंतर इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले पहिले भारतीय, मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत वकिली करणारे पहिले भारतीय बॅरिस्टर, उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे पहिले मुस्लिम न्यायाधीश, त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलेले पहिले भारतीय न्यायाधीश असे अनेक मान तय्यबजी यांच्याकडे जातात. न्यायमूर्ती बद्रुद्दीन तय्यबजी यांचा जन्म मुंबईच्या एका सुस्थितीतील सुलेमानी बोहरा कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वज सुमारे चारशे वर्षांपूर्वी अरब देशातून येऊन कँबे येथे व्यापार करू लागले आणि नंतर तेथून मुंबईला येऊन स्थायिक झाले. बद्रुद्दीन यांचे वडील तय्यब अली भाईमिया यांची इच्छा आपल्या मुलाने आधी इंग्लंडमध्ये सर्वसाधारण शिक्षण घ्यावे आणि नंतर बॅरिस्टर व्हावे, अशी होती. त्यानुसार त्यांनी बद्रुद्दीन यांना १८६०मध्ये इंग्लंडला पाठविले. तेथे बद्रुद्दीन यांनी एका खासगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेथे आधी मॅट्रिकसाठी आणि नंतर पदवीसाठी परीक्षा द्यावयाची होती. मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले, पण नंतरच्या पदवी-परीक्षेच्या जरा आधी त्यांची प्रकृती बिघडली. विशेषत: त्यांच्या डोळ्यांमध्ये जणू अधूपणा आला. त्यामुळे डॉक्टरांच्या आदेशानुसार त्यांना भारतात परत येऊन एक वर्षभर सक्तीची, संपूर्ण विश्रांती घ्यावी लागली. प्रकृती सुधारल्यानंतर ते पुन्हा इंग्लंडला गेले आणि १८६७मध्ये मिडल् टेम्पलमधून बॅरिस्टर झाले. वर म्हटल्याप्रमाणे बॅरिस्टर होणारे ते पहिले भारतीय होत. मुंबईला परत आल्यावर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. तोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेतील सर्व बॅरिस्टर वकील इंग्रज होते. वकिलीत यशस्वी होण्यास तय्यबजींना अजिबात वेळ लागला नाही. सुरुवातीपासूनच, सर्व प्रकारचे खटले यशस्वीपणे चालविणारे निष्णात वकील म्हणून त्यांचे नाव झाले. मुंबईबाहेरचे, विशेषत: काठेवाड भागातले खटले त्यांच्याकडे मोठ्या संख्येने येत असत. ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याआधी गुजरातमधील सचिन या संस्थानाच्या नबाबाच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या विरुद्धच्या एका फौजदारी खटल्यात तय्यबजी यांनी आरोपीतर्फे अत्यंत कौशल्याने युक्तिवाद करून खटला जिंकला होता. वकिलीबरोबरच तय्यबजी यांनी मुंबईच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. १८७६मध्ये स्थापन झालेल्या अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेचे ते शिल्पकार चरित्रकोश