पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जयकर, मुकुंदराव रामराव न्यायपालिका खंड जयकर, मुकुंद रामराव ज्येष्ठ न्यायविद १३ नोव्हेंबर १८७३ - १० मार्च १९५९ ऋ मुख्य नोंद - राजकारण खंड मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय पाठारे प्रभू कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुंबई सरकारच्यासचिवालयात एक दुय्यम अधिकारी होते. मुकुंदरावांचे शालेय शिक्षण मुंबईच्या प्रसिद्ध एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि १८९५मध्ये बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर ते एम.ए. करण्यासाठी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी इंग्रजी व संस्कृत हे वैकल्पिक विषय म्हणून घेतले. त्यात त्यांना धर्मशास्त्र, वेगवेगळ्या स्मृती आणि पूर्वमीमांसा यांचा अभ्यास करावयास मिळाला. १८९७मध्ये गटे आणि कालाईल यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून त्यांनी एम.ए. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एलएल.बी.चे एक वर्ष पूर्ण केले. कायद्याचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी १९०१मध्ये ते इंग्लंडला गेले, पण प्रकृती बिघडल्याने त्यांना परत यावे लागले. आईच्या उत्तेजनामुळे त्यांनी १९०२ मध्ये एलएल. बी. पूर्ण केले. नंतर एप्रिल १९०३मध्ये ते पुन्हा इंग्लंडला गेले. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या बेलियल कॉलेजमधून कायद्याची बी.सी.एल. ही पदवी घेण्याची त्यांची इच्छा होती, पण तेथे त्यांना प्रवेश मिळाला नाही. मात्र सुदैवाने मार्क रोमर या वकिलाच्या चेंबरमध्ये काम मिळाले. ते दोन वर्षे इंग्लंडमध्ये राहिले. या वास्तव्यात त्यांना कायद्याच्या असंख्य गोष्टी अवगत झाल्या. १९०५मध्ये ते बॅरिस्टर झाले आणि मुंबईला परत येऊन त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. सुरुवातीची काही वर्षे त्यांना त्यांचे आजोबा (आईचे वडील) वासुदेव जगन्नाथ कीर्तीकर यांचे मार्गदर्शन लाभले. कीर्तीकर तेव्हा सरकारी वकील होते. याच काळात जयकरांवर न्या.रानडे आणि नामदार गोखले यांचा प्रभाव पडला. लोकमान्य टिळकांबद्दलही त्यांना नितांत आदर होता. जयकरांची अभ्यासाची व मननाची भूक दांडगी होती. तत्त्वज्ञानातील षड्दर्शनांपैकी पूर्वमीमांसेचे अध्ययन त्यांनी सुमारे बारा वर्षे केले. १९१६मध्ये मुंबई उच्च न्यायालयातील तरुण वकिलांनी सोप्या खटल्यांची कामे त्यांच्याकडे यावीत यासाठी एक योजना तयार केली. त्यांना जयकरांनी मार्गदर्शन केले. १९२०पर्यंत जयकर मुंबईत प्रमुख वकील म्हणून मान्यता पावले. हिंदू दत्तकविधानांचे खटले लढविणे हे जयकरांचे वैशिष्ट्य होते. अशा खटल्यांतील बहुतेक निर्णय त्यांच्या पक्षकारांच्या बाजूने होत. गाजलेल्या ताईमहाराज खटल्यात मुंबई उच्च न्यायालयात जयकरांनी लोकमान्य टिळकांविरुद्ध युक्तिवाद करून विजय मिळवला. लोकमान्यांचे स्थान लक्षात ठेवून जयकरांनी आपला युक्तिवाद अत्यंत काळजीपूर्वक केला होता. आपल्याबद्दल एवढी कळकळ दाखविल्याबद्दल लोकमान्यांनी त्यांची स्तुती केली. नंतर लोकमान्यांनी प्रिव्ही काउन्सिलमध्ये अपील केले ६२ शिल्पकार चरित्रकोश