पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड | सुर्वे, मधुसूदन नारायण झाली आणि भारतीय युद्धनौकांवर सतत हवाई हल्ले होत राहिले. मुक्ती वाहिनीच्या दोन बोटी बुडविल्या गेल्या. कमांडर सामंतांनी आपल्या जीवाची काळजी न करता हल्ल्यातून वाचलेल्या बहुसंख्य लोकांना सुरक्षितपणे आणले आणि शत्रूवर निकराचे हल्ले चढवून त्याचे प्रचंड नुकसान केले. संपूर्ण युद्धकाळात मोहन नारायण सामंत यांनी दाखविलेल्या अतुल शौर्य, कर्तव्यनिष्ठा व नेतृत्वाबद्दल त्यांना महावीरचक्र प्रदान केले गेले. - रूपाली गोवंडे

साळुंके, पांडुरंग बाळकृष्ण भूसेना - शिपाई महावीरचक्र १ मे १९५० - ६ डिसेंबर १९७१ पांडुरंग बाळकृष्ण साळुंके यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मानेराजुरी या गावी झाला. १९७०मध्ये ते भूसेनेत दाखल झाले. १९७१च्या पाकिस्तान युद्धात साळुंके यांचा सहभाग होता. त्या वेळी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या एका बटालियनने चिलखती दलाच्या सहाय्याने शत्रूवर चाल केली असता शत्रूच्या रणगाड्यांना धोका निर्माण झाला. या वेळी आपला जीव धोक्यात टाकून शिपाई पांडुरंग साळुंके यांनी शत्रूच्या अग्निबाण प्रक्षेपकावर हल्ला केला. शत्रूच्या स्टेनगनचा गोळीबार खूप जवळून होत असतानाही त्यांनी शत्रूवर उडी मारून तो अग्निबाण प्रक्षेपक अक्षरश: हिसकावून घेतला. या कामगिरीच्या वेळी शिपाई साळुंके यांनी दुर्दम्य धैर्य व उच्च दर्जाचा निर्धार प्रदर्शित केला. त्यांना मरणोत्तर ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले. - संध्या लिमये

सुर्वे, मधुसूदन नारायण भूसेना - हवालदार शौर्यचक्र २० जानेवारी २००५ मध्ये मधुसूदन नारायण सुर्वे हे स्क्वाड कमांडेड या तुकडीत होते. मणिपूर येथील चुरचंद्रपुर जिल्ह्यातील अतिरेक्यांच्या अड्ड्यावर हल्ला करण्याची मोहीम या तुकडीवर सोपवण्यात आली होती. हवालदार सुर्वे हे एखाद्या निष्णात कमांडोसारखे शिताफीने या अड्ड्यामध्ये शिरले. परंतु त्याच वेळेला तिथल्या एका पहारेकर्‍याला त्यांची चाहूल लागली व तो सतर्क झाला. त्या गडबडीत सुर्वे यांच्या पोटाला इजा झाली. धोका समोर दिसत असूनही ते कौशल्याने ते पुढे सरकले. तेवढ्या वेळात मात्र अतिरेकी चांगलेच सावध झाले होते. प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही अंदाधुंद गोळीबार सुरू केला व आजूबाजूच्या जंगलाच्या दिशेने ते जायला लागले. हवालदार सुर्वे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पळून जाणार्‍या अतिरेक्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यातल्या एकाला त्यांनी जखमी केले आणि बाकीच्यांच्या दिशेने बंदुकीची फैर झाडली. अतिरेकी व हवालदार सुर्वे यांच्यात घनघोर गोळीबार सुरूच होता. रक्तस्त्राव होऊन बेशुद्ध होईपर्यंत सुर्वे बंदुकीच्या फैरी झाडतच राहिले. या मोहिमेमध्ये अतिशय धीटपणाने, त्यांनी एका अतिरेक्याला ठार केले व बाकीच्यांना जखमी केले. शिल्पकार चरित्रकोश स ।