पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड राणे, रामा राघोबा हेदेखिल होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी या कागदपत्रांवर भारताच्या बाजूने याच तीन सैनिकी अधिकार्‍यांच्या सह्या आहेत. निवृत्तीनंतर माधवराव राजवाडे पुण्यात स्थायिक झाले. तेथेच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. - राजेश प्रभु साळगांवकर

राणे, रामा राघोबा भूसेना - सेकंड लेफ्टनंट परमवीरचक्र २६ जून १९१८ - ११ एप्रिल १९९४ रामा राघोबा राणे यांचा जन्म धारवाड जिल्ह्यातील हवेली या गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा बोर्डाच्या शाळेत झाले. पुढील शिक्षण उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या चेंदिया या गावात झाले. त्यांचे वडील राघोबा राणे हे पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. राणे हे लढवय्या राजपूत राणा जमातीचे वंशज. ते गांधीजींच्या असहकार चळवळीनेही प्रभावित झाले होते. त्यांच्या मनात देशासाठी कार्य करण्याची भावना जागृत झाली. १० जुलै १९४० रोजी ‘बॉम्बे इंजिनिअर्स’ या सैन्यपथकात ते भरती झाले. त्या वेळी दुसरे महायुद्ध सुरू होते. रामा राघोबा राणे यांनी सैन्यात प्रवेश करताच आपली चमक दाखवली. त्यांच्या तुकडीत ते ‘सर्वश्रेष्ठ प्रवेशक’ ठरले. त्यांना ‘कमांडंटची छडी’ बक्षीस म्हणून मिळाली. त्यांना ‘नाईक’ पदावर बढती मिळाली. राणे यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर ते अठ्ठाविसाव्या फिल्ड कंपनीत रुजू झाले. ही कंपनी सव्विसाव्या इन्फन्ट्री डिव्हिजनसह ब्रह्मदेशात लढत होती. तेथून माघार घेताना त्यांच्यावर बुथिदौंग येथील दारूगोळा भांडार, तसेच गाड्या नष्ट करण्याची जबाबदारी सोपवली गेली होती. जपान्यांच्या सैन्याशी त्यांनी दोन हात केले. त्यांच्या धैर्याबद्दल, चिकाटीबद्दल त्यांना लगेचच ‘हवालदार’ पदावर बढती मिळाली. त्यांचे उत्कृष्ट नेतृत्व लक्षात घेऊनच १९४८मध्ये जम्मू-काश्मीर आघाडीवर जाण्यापूर्वीच त्यांची सेकंड लेफ्टनंटपदी नेमणूक झाली. तो त्यांच्या सैनिकी जीवनातला सर्वोत्तम काळ ठरला. १९४८मध्ये पाकिस्तानी हल्लेखोरांनी काश्मीरवर आक्रमण केले. त्याला उत्तर देताना भारताने आपला आधी गमावलेला जम्मू-काश्मीरचा भूभाग पुन्हा मिळवण्याची धडपड सुरू केली. भारतीय सैन्याने पहिल्यांदा नौशेरावर ताबा मिळवला. पाकिस्तानी हल्लेखोरांशी लढा देत झांगर, राजौरी, बरवलीरिज, चिनगस या जम्मू-काश्मीरमधील ठिकाणांवर कब्जा मिळवणे हे भारतीय सैन्यासाठी आवश्यक होते. शत्रूने या ठिकाणांच्या वाटेवर अनेक अडथळे निर्माण केले होते. रस्त्यांची नासधूस केली होती. युद्ध सामग्रीची वाहतूक करणे, सैन्य घेऊन जाणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत रामा राणेंनी रस्ता निर्धोक, वाहतुकीसाठी खुला करण्याचे जोखमीचे काम केले. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांनी ही कामगिरी पार पाडली. ८ एप्रिल १९४८ रोजी राणे यांना नौशेरा - राजौरी भागातल्या रस्त्यावरचे अडथळे ४८० शिल्पकार चरित्रकोश