पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड भिडे, विजयकुमार विनायक भिडे, विजयकुमार विनायक भूसेना - मेजर जनरल महासंचालक-सीमारस्तासंघटना अतिविशिष्टसेवापदक ७ ऑक्टोबर १९२२ विजयकुमार भिडे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील विनायक भिडे हे विलयतेतून (इंग्लंडमधून) आय.सी.एस. होणार्‍या मोजक्या भारतीयांपैकी होते. मात्र विजय भिडे यांच्या जन्मानंतर तीनच महिन्यांनी विनायकरावांचे निधन झाल्याने आई माणिकबाई अमरावती येथे आपल्या वडिलांकडे - सर मोरोपंत जोशी यांच्याकडे - राहण्यास गेल्या. विजय भिडे यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण डेहराडूनच्या डून स्कूल मध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण काही दिवस प्रयागच्या अलाहाबाद विद्यापीठात आणि पुढे मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे झाले. त्याच काळात महायुद्ध पेटल्याने विजय भिडे भारतीय सैन्य प्रबोधिनी (इंडियन मिलिटरी अ‍ॅकेडमी) मध्ये दाखल झाले. तेथून १९४२ मध्ये त्यांची निवड सेनादलांच्या अभियांत्रिकी विभागात ‘बॉम्बे सॅपर्स’ मध्ये झाली. चिलखती दलासोबत (आर्मर्ड कोअर) असणार्‍या सदतिसाव्या फिल्ड स्क्वॉड्रनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. १९४४ मध्ये त्यांची स्क्वॉड्रन ब्रह्मदेशात अराकान प्रांतात आजाद हिंद सेनेसोबत आलेल्या जपानी फौजांशी लढण्यासाठी पाठविण्यात आली. १९४५ मध्ये त्यांना मोटार सायकलवर अपघात झाल्याने आजारपणाच्या रजेवर मीरत येथे पाठविण्यात आले. तेथूनच त्यांना वायव्य सरहद्द प्रांतात टोळीवाल्यांच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. १९४६ मध्ये जागतिक महायुद्धानंतरही लढाया सुरूच असलेल्या इंडोनेशियात त्यांच्या तुकडीला पाठविले गेले. तेव्हा विजय भिडे कॅप्टनपदी कार्यरत होते. तेथून परत आल्यावर त्यांनी पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातून (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) ए.एम.आय.इ. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांची लगेच आसाम प्रांतात चार प्रमुख रस्ते बनविण्याच्या कार्यावर नेमणुक झाली. या चारही प्रमुख महामार्गांचे त्यांनी सर्वेक्षणापासून बांधणीपर्यंतचे काम तीन वर्षांत पूर्ण केले. १९५२ मध्ये विजय भिडे यांचा विवाह कुसुम करोडे यांच्यासोबत झाला. त्याच सुमारास त्यांची जम्मू जवळ नगरोठा येथे सव्विसाव्या डिव्हिजनमध्ये लेफ्ट. कर्नल पदावर नियुक्ती झाली. तेथून लवकरच अंबाल्याला चौथ्या डिव्हिजनच्या ‘कमांडर - इंजिनिअर्स’ या पदावर भिडेंची नियुक्ती करण्यात आली. तेथील तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जन. महादेव सिंग, जन. सेन आणि जन.कौल या तीन वरीष्ठ अधिकार्‍यांसोबत कार्य केले. तेथून त्यांची बदली १९५७ मध्ये सिमला येथे भूसेनेच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयात करण्यात आली. १९५९ ते १९६२ या काळात विजय भिडे वरीष्ठ अधिकारी पाठ्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती ‘कर्नल’ पदावर पुण्याच्या सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात युद्ध अभियांत्रिकी विभागाचे (कॉम्बॅट इंजिनिअरिंग) विभाग प्रमुख म्हणून झाली. तेथून लगेच १९६४ मध्ये त्यांना । शिल्पकार चरित्रकोश ४७१