पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड नाडकर्णी, जयंत गणपत फ्रिगेट जातीची युद्धनौका आय.एन.एस. गोदावरी (एफ २०) कारवारचे. ते मुंबईतील ऑपेरा हाउस परिसरात राहत. त्यामुळे जयंत व त्यांच्या भावंडांचे शिक्षण गिरगावातील चिकित्सक हायस्कूलमध्ये झाले. जयंत नाडकर्णी शाळेत शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जयंत नाडकर्णी इंग्रजी सहावीत असतानाच (आजच्या नववीच्या समकक्ष) वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांची आय.एम.एम.टी.एस. ‘डफरीन’ या व्यापारी नौदल प्रशिक्षण जहाजावर प्रशिक्षणाकरिता निवड झाली. खरे तर, ‘डफरीन’वर वयाच्या सोळाव्या वर्षीच प्रवेश दिला जात असे; पण नाडकर्णी याला अपवाद ठरले. तीन वर्षांच्या खडतर अभ्यासक्रमाअंती त्यांनी ‘एक्स्ट्रा फर्स्ट क्लास सर्टिफिकेट’ ही ‘डफरीन’वरील सर्वोच्च पदवी मिळविली. तेथून त्यांची भारतीय नौसेनेत फेबु्रवारी १९४९ मध्ये विशेष निवड झाली. भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले असल्यामुळे सेनादलांच्या विशेष प्रशिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांना मार्च १९४९ मध्ये प्रशिक्षणासाठी ब्रिटनमधील डार्टमाउथ येथील ‘रॉयल मरीन नेव्हल कॉलेज’मध्ये पाठविण्यात आले. मे१९५३ मध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. भारताने ब्रिटनकडून खरेदी केलेल्या आय.एन.एस. गंगा या युद्धनौकेवर त्यांची दिशादर्शक अधिकारी (नेव्हिगेशन ऑफिसर) म्हणून नियुक्ती झाली. जुलै १९५५ मध्ये त्यांना दिशादर्शनातील विशेष अभ्यासक्रमासाठी पुन्हा ब्रिटनला, रॉयल मरीन नेव्हल कॉलेजला पाठविण्यात आले. त्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून मार्च १९५६ मध्ये भारतात परतल्यावर आय.एन.एस. तीर या फ्रिगेट गटातील युद्धनौकेवर त्यांची दिशादर्शन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. एप्रिल १९५६ मध्ये त्यांचा कारवारच्या विमल दिवेकर यांच्याशी विवाह झाला. ऑक्टोबर १९५६ पासून पुढील पाच वर्षे त्यांनी आय.एन.एस. दिल्ली या क्रूझर गटातील युद्धनौकेवर दिशादर्शन अधिकारी म्हणून काम केले. डिसेंबर १९६१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून गोवा प्रदेश पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला. त्या वेळी नौसेनेची भूमिका महत्त्वाची होती. तेव्हा जयंत नाडकर्णी यांच्यासह काही जणांना पुन्हा आय.एन.एस. दिल्लीवर जबाबदारी देण्यात आली. या संग्रमात दीवमध्ये शिरणे भारतीय भूसेनेला शक्य होत नव्हते. त्या वेळी आय.एन.एस. दिल्लीने दीवच्या किल्ल्यावर अत्यंत जवळून तोफांचा भडिमार करून तेथील पोर्तुगिजांना जेरीस आणले. त्यामुळे भारतीय भूसेनेला दीववर ताबा मिळविणे सोपे गेले. या लढाईत नाडकर्णी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

शिल्पकार चरित्रकोश ४५१