पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड गजेंद्रगडकर, प्रल्हादाचार्य बाळाचार्य गजेंद्रगडकर, प्रल्हादाचार्य बाळाचार्य भारताचे सरन्यायाधीश, ज्येष्ठ न्यायविद १६ मार्च १९०१ - १२ जून १९८१ न्यायमूर्ती प्रल्हादाचार्य बाळाचार्य गजेंद्रगडकर यांचा जन्म सातारा येथे व्युत्पन्न संस्कृत पंडितांच्या प्रख्यात कुटुंबात झाला. त्यांचे माध्वसंप्रदायी वैष्णव घराणे मूळचे आजच्या कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातल्या गजेंद्रगडचे होते. प्रल्हादाचार्यांच्या वडिलांचे पणजोबा राघवेंद्राचार्य हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस सातार्‍याच्या छत्रपती प्रतापसिंहांच्या निमंत्रणावरून सातारा दरबारचे राजपंडित म्हणून गजेंद्रगडहून सातार्‍यास आले. सातार्‍यातील त्यांचे घर ही जणू एक संस्कृत पाठशाळाच होती. तेथे संस्कृत विद्या शिकण्यास विविध ठिकाणांहून विद्यार्थी येत असत. त्यांच्या घराण्यातील संस्कृत विद्येची ही परंपरा प्रल्हादाचार्यांच्या पिढीपर्यंत चालू राहिली. प्रल्हादाचार्यांचे एक वडील बंधू अश्वत्थामाचार्य हे संस्कृतचे प्रसिद्ध प्राध्यापक होते आणि स्वत: प्रल्हादाचार्यही संस्कृत विद्वान होते. प्रल्हादाचार्यांचे शालेय शिक्षण सातारा उच्च माध्यमिक शाळेमध्ये झाले. १९१८मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी दोन वर्षे धारवाडच्या कर्नाटक महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. तेथून इंटर झाल्यानंतर ते पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामध्ये दाखल झाले आणि १९२२मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. (ऑनर्स) ची परीक्षा इंग्रजी व संस्कृत हे विषय घेऊन प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांना दक्षिणा फेलोशिप मिळाली. १९२४मध्ये इंग्रजी व संस्कृत हेच विषय घेऊन ते एम.ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांना ‘गोकुळजी झाला वेदान्त पारितोषिक’ आणि ‘भगवानदास पुरुषोत्तमदास शिष्यवृत्ती’ मिळाली. १९२४मध्येच प्रा.ज.र.घारपुरे यांनी पुण्यामध्ये पूना लॉ कॉलेज (आजचे आय.एल.एस. विधि महाविद्यालय) स्थापन केले. एम.ए. झाल्यानंतर प्रल्हादाचार्यांनी तेथे प्रवेश घेतला, आपण वकील व्हायचे, असे त्यांनी आधीच ठरविले होते. ऑगस्ट १९२६मध्ये प्रल्हादाचार्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिली सुरू केली. वकिलीत लवकरच त्यांचा जम बसला आणि एक यशस्वी व कुशल वकील म्हणून त्यांचे नाव झाले. सुमारे १९ वर्षांच्या आपल्या वकिलीच्या कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारचे दिवाणी दावे आणि फौजदारी खटले लढविले. मार्च १९४५मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अल्पावधीतच एक समतोल विचारांचे, कायद्याचे सखोल ज्ञान असणारे आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे शांतपणे ऐकून अचूक न्याय देणारे न्यायाधीश म्हणून त्यांची ख्याती झाली. उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. त्यातील अनेक हिंदू कायद्यासंबंधी होते; त्यातही एक आज ज्वलंत प्रश्न बनलेल्या सगोत्र विवाहाच्या मुद्द्याबाबत होता. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतानाच ते मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटचे सदस्य होते. त्याच काळात बँक

शिल्पकार चरित्रकोश