पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क कोरटकर, केशव संतुक न्यायपालिका खंड मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद आदी संस्थानाबाहेरच्या महाराष्ट्रातील प्रमुख सांस्कृतिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेपासून केशवराव त्याच्याशी निगडित होते. हैदराबाद संस्थानात वेगळी साहित्य संस्था स्थापन करणे अवघड असल्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्षेत्रात हैदराबाद संस्थानातील मराठी भागाचा समावेश करण्यात आला होता. अमरावती येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९०७साली विवेकवर्धिनी या हैदराबाद शहरातील प्रमुख शिक्षण संस्थेची स्थापना करणार्‍यांत केशवराव कोरटकर एक होते. ‘हैदराबाद संस्थान सामाजिक परिषद’ या नावाने दरवर्षी अधिवेशन भरवून सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह करण्याचा उपक्रम काही वर्षे चालला. त्यातील हदगाव जि. नांदेड येथे १९१९साली भरलेल्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्षपद केशवरावांनी भूषविले होते, तर हैदराबादेत भरलेल्या चौथ्या अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. आपल्या प्रजेत धर्माच्या आधारावर भेदभाव करणे हे हैदराबादच्या निजामी राजवटीच्या धोरणाचे एक अंग होते. संस्थानात ‘आर्य समाज’ स्थापन झाल्यानंतर धार्मिक जुलमाविरुद्ध प्रतिकार होऊ लागला. या चळवळीने हिंदूंना निर्भय बनण्यास साहाय्य केले. आर्य समाजाशी केशवराव कोरटकरांचा विशेष संबंध होता. आर्य समाजाच्या अनेक उपक्रमांचे ते पाठीराखे होते. रँड व आयर्स्ट यांचा खून केल्याचा आरोप असलेल्या चापेकर बंधूंना त्यांनी आर्थिक साहाय्य केल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. १८९७साली हैदराबाद संस्थानात खूपच मर्यादित अधिकार असलेले एक कायदेमंडळ स्थापन झाले होते. सभासदांची नियुक्ती सरकारच करीत असे. या कायदेमंडळाचे सभासद म्हणूनही कोरटकरांनी काम केले. विधवाविवाहापासून झालेली संतती औरस समजली जावी यासाठी, त्याचप्रमाणे हैदराबादच्या कायद्यात बलात्काराच्या व्याख्येत संमतीवयाचा उल्लेख करण्यासाठीचे बिलही त्यांनी मांडले होते. २१ मे १९३२ रोजी पुणे येथे मधुमेहाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. केशव मेमोरियल हायस्कूल या नावाची एक शाळा हैदराबादेत त्यांच्या स्मृत्यर्थ उभी आहे. - न्या.नरेंद्र चपळगावकर

शिल्पकार चरित्रकोश