पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड मोडक, इमॅन्युएल सुमित्र घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून सरासरी २८ ते ४० वयोगटातील १५० महिलांचे आर्थिक पुनर्वसन करण्यात आले. ‘पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन’मध्ये संचालक पदावर काम करत असताना, ऊर्जा बचतीसंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणार्‍या साप्ताहिक मालिकांसाठी मार्गदर्शनाचे काम मेहेंदळे यांनी केले. एनर्जी ऑडिट विभागाची पुनर्रचना करून बायोडिझेल मंत्रालयासाठी नवीन योजना व कार्यक्रमांची आखणी केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी या पदावर असताना लीना मेहेंदळे यांनी महाराष्ट्र, बिहार आणि राज्यस्थान या राज्यांमध्ये महिलांविरुद्ध घडणार्‍या गुन्ह्यांचा अभ्यास केला आणि हिंदी वृत्तपत्रामध्ये महिलांसाठी कायद्याचे मार्गदर्शन करणारे साप्ताहिक सदर चालवले. महिलांना न्याय मिळावा यासाठी महिलाविषयक कायद्यांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ‘द कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन’ (सीइडीएडब्ल्यू) या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. जमाबंदी आयुक्त आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असताना लीना मेहेंदळे यांनी कार्यालयांचे संगणकीकरण घडवून आणले. तसेच जमिनींचे नकाशे, जमिनी संदर्भातील कागदपत्रांचे तपशील यांचे देखील संगणकीकरण करण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी कार्यालयीन कामकाजाची सोपी पद्धत अंमलात आणून कामाला एक नवी दिशा दिली. पुणे येथे १९८६ साली स्थापन झालेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी’चे देशव्यापी नेटवर्क त्यांनी तयार केले तसेच आरोग्य मंत्रालयासाठी अनेक योजनाही तयार केल्या. अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग या पदावरून त्या निवृत्त झाल्या. त्या सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आणि सोबतच्या कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षित करत. त्यांनी संगणक वापरासंबंधीच्या महत्त्वाच्या बाबी विशद करणारे ‘संगणकाची जादूई दुनिया’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. चालू घडामोडींबरोबरच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, बालवाङ्मय, संगणक, कायदा, लोकप्रशासन अशा विविध विषयांवर त्यांचे ५०० लेख आणि २३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकप्रशासनातील अनुभवांवर त्यांनी लिहिलेली ‘समाजमनाची बिंबे’ आणि ‘इथे विचारांना वाव आहे’ ही पुस्तके समाजातील समस्यांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाचकाला देतात तर प्रशासकीय सेवेत आपले भविष्य घडवू इच्छिणार्‍या उमेदवारांना प्रशासकीय सेवेकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देतात. इंटरनेटवरील मराठी भाषेच्या वापराबाबत त्या विशेष आग्रही असून संगणकावरील भारतीय भाषा वापरण्यासाठीच्या सॉफ्टवेअरचा त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. सध्या लीना मेहेंदळे या केंद्रीय प्रशासन लवादाच्या सदस्या म्हणून बंगलोर येथे कार्यरत आहेत. - संध्या लिमये

मोडक, इमॅन्युएल सुमित्र पोलीस महासंचालक - महाराष्ट्र राज्य २५ मार्च १९२० - २९ एप्रिल २०१० इमॅन्युएल मोडक यांचा जन्म सातारा येथे झाला. पुणे येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. मुंबईतील महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली. त्याच काळात ते ब्रिटिश इंडियन पोलीस परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये सातारा येथे ते साहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर रुजू झाले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा तो काळ होता. सातार्‍यात त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी काम ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदालन करण्यात येई. त्या शिल्पकार चरित्रकोश ३१९