पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेढेकर, कृष्णनाथ पांडुरंग प्रशासन खंड मिळवली. शांताराम दाभोळकर हे पारितोषिकही त्यांनी मिळवले. १९६६ मध्ये त्यांनी एम.एस्सी.ची पदवी मिळवली. त्याच वर्षी भारतीय पोलीस सेवेतही त्यांची निवड झाली. त्यांना ठाणे येथे त्यानंतर वर्षभराचे प्रशिक्षण मिळाले. पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांना त्यांची पहिली नियुक्ती अहमदनगर येथे मिळाली. अहमदनगर जिल्ह्याचे सहअधीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झाल्यावर त्यानंतर त्यांनी नागपूर जिल्ह्याचे ग्रामीण अधीक्षक, तर यवतमाळ, मुंबई, सातारा, नाशिक, ठाणे ग्रामीण आणि मुंबई जिल्ह्याचे अधीक्षक म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर मुंबई व नागपूरचे अतिरिक्त आयुक्त, ‘रॉ’ विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम केले. काही काळ ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्रत्येक नियुक्तीच्या वेळी पोलीस खात्यात काही नवीन करता येईल का, पोलिसांच्या दैनंदिन कामात काय बदल करता येऊ शकतील, याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला. पुण्याच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून आणि मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम करताना गुन्हे शाखेचे प्रश्न, सायबर क्राइम यांसारखे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला. मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइझ्ड क्राइम अ‍ॅक्ट) राबवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या विशेष व महत्त्वपूर्ण सेवेसाठी त्यांना भारतीय पोलीस पदक व राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे. १९९८ मध्ये नेदरलँड येथे झालेल्या इंटरनॅशनल पोलीस वीक परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे महासंचालक या पदावरून ते ३० सप्टेंबर २००१ रोेजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी स्वत:ला सामाजिक संस्थांशी जोडून घेतले आहे. मोहल्ला कमिटी मूव्हमेंट ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत. तसेच सरकारी कामकाजात पारदर्शकता, प्रामाणिकपणा यावा यासाठी प्रयत्न करणार्‍या पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टचेही ते विश्वस्त आहेत. - वर्षा फडके-आंधळे

मेढेकर, कृष्णनाथ पांडुरंग अतिरिक्त संचालक-गुप्तवार्ता विभाग पोलीस महासंचालक-महाराष्ट्र राज्य १ फेब्रुवारी १९२७ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात पोलीस प्रशासनाची घडी बसवणार्‍या काही निवडक आय.पी.एस.अधिकार्‍यांतीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे कृष्णनाथ पांडुरंग मेढेकर. बुद्धिमान व अभ्यासू विद्यार्थी म्हणून कृष्णनाथ यांची वाटचाल सुरू होती. जीवशास्त्रात त्यांनी विशेष श्रेणी (विज्ञान शाखा-पदवी) मिळवली होती. सागरी जीवशास्त्र या विषयाचा विशेष अभ्यास करून त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व जर्मन या भाषांवरही प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात ते काही काळ प्राध्यापक होते, तसेच त्यांचा पीएच.डी.चा अभ्यासही सुरू होता. पण १९४९ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मेढेकर यांनी सुयश प्राप्त केल्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेमध्ये दाखल झाले. १९४९ ते १९८५ अशी सुमारे ३६ वर्षे त्यांनी पोलीस प्रशासनाद्वारे आपली सेवा रुजू केली. पोलीस प्रशासनातील प्रदीर्घ सेवेत मेढेकर यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पदांवर कार्य केले. एक कर्तव्यदक्ष व जबाबदार पोलीस अधिकारी या भूमिकेबरोबरच संरक्षणतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी, कुशल खेळाडू, गिर्यारोहक, लेखक व एक अनुभवी प्रशासक या त्यांच्या भूमिकाही

शिल्पकार चरित्रकोश