पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड फडके, गोविंद नारायण फडके, गोविंद नारायण महाव्यवस्थापक-पश्चिमरेल्वे ३० एप्रिल १९३४ गोविंद नारायण फडके यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव सुभद्राबाई होते. त्यांचे वडील मुंबईतच इस्माईल यूसुफ महाविद्यालय व नंतर रूपारेल येथे गणिताच्या अध्यापनाचे काम करीत असत. वडील शिक्षक असल्याने गोविंदरावांना घरातूनच शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण छबिलदास शाळेतून पूर्ण झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते बोर्डातून अकरावे आले. १९५२ साली त्यांनी इंटरची परीक्षा एलफिन्स्टन महाविद्यालयातून दिली व त्या वेळी ते विद्यापीठात दुसरे आले. त्या काळी समाजात अभियांत्रिकीच्या शिक्षणाचे वारे असल्यामुळे ते आपसूकच अभियांत्रिकीकडे वळले आणि नावाजलेल्या मुंबईच्याच व्ही.जे.टी.आय. अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांना नागरी अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला. १९५५ साली त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फरीदपूरच्या आयआयटीत पुढचे शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर त्यांना नोकरी स्वीकारावी लागली. लोणावळ्याच्या सैन्य अभियांत्रिकीमध्ये ते रुजू झाले. परंतु तेथेे स्वस्थ न बसता त्यांनी इंडियन रेल्वे सर्व्हिस इंजिनिअरिंगची परीक्षा दिली. १९५७ साली ते रेल्वे सेवेत साहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले. गोंदिया येथे त्यांची रेल्वे सेवेतील पहिली नेमणूक झाली. या ठिकाणी त्यांना नागपूर ते कलकत्ता जाणार्‍या एकेरी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण काम देण्यात आले. या मार्गात येणार्‍या नद्यांवरील पूल बांधून रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडले. त्यांच्या या कामगिरीमुळे सोबतच्या १०० अभियंत्यांपैकी त्यांची एक्स्क्ल्यूझिव्ह अभियंता म्हणून निवड करण्यात आली. या दरम्यान कलकत्त्यात (कोलकाता) हल्दिया हे नवीन बंदर उभारण्यात येत होते. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या बंदराच्या उभारणीसाठी आणि बंदरातून होणारा व्यापार संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी रेल्वेमार्गाची आवश्यकता होती. बंदर परिसरात २०० मैलांपर्यंत कुठेच चांगला दगड मिळत नव्हता आणि बंदर उभारण्यासाठी दगडांची आवश्यकता होती. बाहेरचा दगड आणण्यासाठी रेल्वेची नितांत गरज होती म्हणून या रेल्वे उभारणीच्या कामावर गोविंद फडके यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणापासून ते रेल्वे त्या मार्गावरून धावली जाण्यापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण केले. या दरम्यान त्यांना एक महत्त्वाची अडचण आली. गाळाच्या मातीने बनवलेल्या एका कालव्यावरील पुलाचा (हिजली टाइडल कॅनाल) एक हजार फूट लांब भराव पूर्णत: खचला आणि ३० फुटांवरून तो २० फुटांपर्यंत खाली आला होता. कॅनालमधली वाहतूक थांबली होती. हा पूल पुन्हा उभारणे गरजेचे शिल्पकार चरित्रकोश २९१